esakal | दिवाळीनंतर ४७ विवाह मुहूर्त; पण बँड वाजणार का? 
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

कोरोनामुळे सात महिन्यांपासून विवाह बंद आहेत. विवाहाशी संबंधित सर्वच व्यवसाय मंदीत सापडले आहेत. त्यांच्यावर बेरोजगारीसह कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विवाहेच्छुकांची हौस टांगली गेली आहे.

दिवाळीनंतर ४७ विवाह मुहूर्त; पण बँड वाजणार का? 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : कोरोनामुळे सात महिन्यांपासून लग्नसराईला अद्याप पूर्णपणे परवानगी मिळालेली नाही. मागील वर्षीचे इच्छुक धडाकेबाज विवाहासाठी थांबले आहेत. लाॅकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह जुळले आहेत. बॅन्ड व्यावसायिकांसह इतर संबंधित व्यवसायांनाही परवानगी नसल्याने विवाह तिथी निश्चितीबाबत अडचणी येत आहेत. दिवाळीनंतर विवाहाचे ४७ मुहूर्त जुलैपर्यंत आहेत. 
कोरोनामुळे सात महिन्यांपासून विवाह बंद आहेत. विवाहाशी संबंधित सर्वच व्यवसाय मंदीत सापडले आहेत. त्यांच्यावर बेरोजगारीसह कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. विवाहेच्छुकांची हौस टांगली गेली आहे. दिवाळीनंतर तरी विवाह समारंभांना परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

बॅन्डला परवानगी हवी 
दीड महिन्यांपासून अनलाॅक सुरू झाले आहे. विविध कार्यक्रमांनाही अटींनुसार परवानगी मिळत आहे. जवळपास ९० टक्के व्यवसाय सुरू झाले आहेत. अद्यापही बॅन्ड व्यवसायाला बंदी आहे. त्यामुळे ते बेरोजगार झाले आहेत. दहा लाखांवर कर्ज उचलून हा व्यवसाय सुरू केला आहे. कलाकारांनाही उचल दिली आहे. कर्जाचे हप्ते फेडू शकत नाहीत. खासगी सावकारांचा तगादा सुरू झाला आहे. व्यवसायमालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. वाजंत्री कलाकारांच्या हातांना सात महिन्यांपासून काम नाही. त्यांची उपासमारी होत आहे. विविध अटींना अधीन राहून व्यवसायाला परवानगी द्यावी. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होईल. मागील थांबलेले विवाह या वर्षी होतील. बॅन्ड व्यवसायास परवानगी मिळाल्यास खानदेशातील शेकडो व्यावसायिक आणि दहा हजारांवर कलाकारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 
दरम्यान, यंदा खानदेशात दिवाळीनंतर ते जुलैपर्यंत ४७ मुहूर्त आहेत. त्यात १७ फेब्रुवारी ते २१ एप्रिलपर्यंत म्हणजे दोन महिने विवाह तिथी नाहीत. मोजक्या तिथींमध्ये विवाह गुंडाळावे लागणार आहेत. त्यास प्रशासनाकडून परवानगीची अपेक्षा आहे. 

विवाह मुहूर्त 
नोव्हेंबर : २५, २७, २९, ३० 
डिसेंबर : १, ७, ९, १०, ११ 
जानेवारी : १८ 
फेब्रुवारी : १५, १६ 
एप्रिल : २२, २४, २५, २६, २७, २८, २९, ३० 
मे : १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९, ३० 
जून : ३, ४, ५, २०, २२, २३, २४ 
जुलै : १, २, ७, १३, १५ 

संपादन ः राजेश सोनवणे