esakal | धरणे ओव्हर फ्लो; तरीही पाणीटंचाईला जावे लागणार सामोरे
sakal

बोलून बातमी शोधा

Water scarcity

धुळे तालुक्यातील १४२ गावातील १२४ ग्रामपंचायतींपैकी बारा गावांना संभाव्य पाणी टंचाई जाणवू शकते. 

धरणे ओव्हर फ्लो; तरीही पाणीटंचाईला जावे लागणार सामोरे

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : जिल्ह्यातील सर्व धरणे, तलाव ओव्हर फ्लो असले तरीही संभाव्य ७७ गावे व ३३ वाड्यांना पाणीटंचाई जाणविण्याची शक्यता असून ११० योजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी ५४ लाख ५८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक २५ गावे व २६ वाड्यांना संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. धुळे तालुक्यातील १४२ गावातील १२४ ग्रामपंचायतींपैकी बारा गावांना संभाव्य पाणी टंचाई जाणवू शकते. 

प्रकल्पात पुरेसा साठा
धुळे जिल्ह्यात 12 मध्यम व 47 लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता 494. 86 दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघु प्रकल्पाची जलसंचयन क्षमता 121.97 दशलक्षघनमीटर असून सध्या त्यात 100 टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता 372. 89 दलघमी असून ते ही 95 टक्के जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील 13 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प पूर्ण भरले असून पांझरा, कनोली, मालनगाव, जामखेडी, बुराई, मुकटी, करवंद, अनेर, वाडीशेवाडी, सोनवद, सुलवाडे, अमरावती हे 100 टक्केपर्यंत भरले आहेत. सध्या जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई नाही. संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा आॅक्टोबर 2020 ते जून 2021 साठी बनविण्यात आला असून त्यात संभाव्य पाणीटंचाई गावे जाहीर झाली आहेत.

उपाययोजना काय? 
जिल्ह्यात एकही मोठी पाणीयोजना प्रस्तावित नाही. धुळे तालुक्यात 12 गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असून त्यासाठी 12 विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार असून त्यासाठी चार लाख 32 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. साक्री तालुक्यात 25 गावे व 26 वाड्यांना पाणीटंचाई जाणवणार असून त्यासाठी एक लाख 80 हजार रूपये अपेक्षित खर्चाचे सहा नवीन विंधन विहिरी घेणे, 18 लाख 90 हजार रूपये खर्चाचे 45 विहीरी अधिग्रहीत करणे, दोन लाखात एका विहीरीचे खोलीकरण व दुरुस्ती व साठ हजार रुपये खर्च करून दोन वाड्यांना बैलगाडी अथवा टँकरने पाणीपुरवठा करणे आदी 51 योजना प्रस्तावित असून त्यावर 23 लाख 30 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरपूर तालुक्यात 18 गावे व 6 वाड्यात पाणीटंचाईची शक्यता असून 10 लाख 44 हजार रुपये खर्चून 24 विहीरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. शिंदखेडा तालुक्यात 22 गावे व एक वाडी संभाव्य पाणीटंचाईच्या यादीत समाविष्ट असून त्यापैकी पाच लाख रुपये खर्चात एका गावातील नळयोजना दुरुस्ती करणे, आठ लाख 82 हजारातून 18 विहीरी अधिग्रहीत करणे, चार गावात टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असून दोन लाख 70 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संभाव्य पाणी टंचाई एप्रिल, मेमध्ये होण्याची शक्यता असून गावांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे