बँड व्यावसायिकांनी खासदार डॉ. भामरेंना घातले साकडे 

जगन्नाथ पाटील   
Saturday, 21 November 2020

कापडणे  : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जन जिवन पूर्वपदावर येण्यास बऱ्याच अडचणी येत आहे. बँड व्यावसायिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अटीशर्तींनुसार परवानगी मिळाली आहे. धुळे जिल्ह्यातही व्यवसायास परवानगी मिळावी या मागणीसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना निवेदन देऊन बॅंड संघटनेने साकडे घातले. लवकरच परवानगी मिळेल, असे खासदार भामरे यांनी सांगितले. 

आवश्य वाचा-  सुटीत फिरण्याचे निमित्‍त पडले महागात; दरीत कोसळून महिलेचा मृत्‍यू

धुळे जिल्ह्यातील बँड मालक व कलाकार उत्कर्ष संघटनेच्या पदाधिकारी व कृषी सभापती बापू खलाणे यांनी खासदार डॉ.भामरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्‍हटले आहे की, राज्यात आठ महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अनलॉकचे विविध टप्पेही सुरु झाले आहेत. विविध कार्यक्रमांनाही विशिष्ट अटींशर्तीनुसार परवानगी मिळत आहे. जवळपास नव्वद टक्के व्यवसाय सुरू झाले आहेत. अद्यापही धुळे जिल्ह्यात बँड व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीनंतर खासगी सावकारांचा तगादा सुरू झाला आहे. व्यवसाय मालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. दुसरा व्यवसाय करण्यास अनेक अडचणी आहेत. या व्यवसायातील वाजंत्री कलाकारांना आठ महिन्यांपासून हाती काम नाही. त्यांची उपासमारी होत आहे. विविध अटींना अधिन राहून जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी. खासदार भामरे यांनी ठोस भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही व्यावसायिकांनी मांडली आहे. 

दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव व जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना निवेदन दिले. यावेळी कृषी सभापती बापू खलाणे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, भिकन पाटील, विजय गुरव, राकेश गुरव, संदीप गुरव, करण पवार आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule allow band professionals demands made to MPs