चोरट्यांनी पळवले चक्क "एटीएम मशिन' 

चोरट्यांनी पळवले चक्क "एटीएम मशिन' 

धुळे ः शहरातील वर्दळीच्या मालेगाव रोडवरील आस्था हॉस्पिटलसमोर "आयसीआयसीआय' बॅंकेच्या एटीएम केंद्रातील एक मशिनच चोरट्यांनी उखडून नेले. या घटनेने अग्रवालनगरसह धुळेकर धास्तावले. चोरट्यांचा कहर पोलिसांना आव्हान देणारा ठरला असून, शहर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. 
आज पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पूर्वी शहरातील काही एटीएम केंद्रांत सुरक्षा रक्षकांवर जीवघेण्या हल्ल्यांसह खुनाची घटनाही घडली आहे. नंतर केंद्रांवर सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आदी विविध उपाययोजना केल्या जाव्यात, अशी सूचना सरकार, प्रशासकीय पातळीवरून दिली गेली. मात्र, ती बहुतांश कागदावरच राहिली. असे असताना धुळे शहरातून थेट एटीएम मशिनच उखडून पळवून नेल्याने वर्दीसह कायद्याचा धाक उरला आहे किंवा नाही, असा प्रश्‍न धुळेकरांना पडला आहे. 
 
चोरी केली कशी? 
चोरट्यांनी पीक- अप व्हॅनसारखे वाहन एटीएम केंद्राजवळ लावले. वाहनाच्या मागच्या बाजूला दोरखंड किंवा जाड तार बांधला व त्याच्या दुसऱ्या टोकाचा एटीएम मशिनला विळखा घातला. वाहन वेगाने नेण्याचा प्रयत्न केल्याने मशिन उखडले गेले. ते काही अंतरापर्यंत घसडत गेले. नंतर मशिन वाहनात टाकल्यावर चार ते पाच चोरटे फरार झाले. वर्दळीच्या रस्त्यावर आणि समोर हॉस्पिटल असताना, तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक असतानाही ही घटना घडली. चोरट्यांनी एटीएम केंद्रालगतचे काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. "रेकी' करून ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त होतो. चोरट्यांनी मशिन नेमके कोठे नेले याचा पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे. एटीएम केंद्राशेजारी असलेल्या चहा विक्रेत्याला पहाटे साडेपाचनंतर ही घटना समजली. नंतर अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसेतज्ज्ञ पथक, श्‍वानपथकाची मदत घेण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 
आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएम केंद्रातून एक मशिन चोरट्यांनी नेले. त्यात 22 लाख 44 हजार 800 ची रुपये आणि तीन लाख रुपयांचे मशिन चोरीस गेले. वाहनाला बांधून मशिन चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मशिन "फाउंडेशन'पासूनच उखडले आहे. घटनास्थळाजवळ संशयित वाहनाच्या टायरचे ठसे आढळले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. 
- गणेश चौधरी, पोलिस निरीक्षक, धुळे शहर पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com