टंगळमंगळमुळे चौपदरीकरण लांबणीवर; धुळे-औरंगाबाद महामार्गाचा प्रश्‍ 

निखिल सूर्यवंशी
Saturday, 24 October 2020

धुळे जिल्ह्यात दळणवळण बळकटीकरणाचे प्रकल्प आयते दारात आले. धुळे-नाशिक, धुळे-पळासनेरपर्यंत महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झाले. अमरावती-धुळेमार्गे नवापूरपर्यतच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू झाले आहे.

धुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४ किलोमीटरचा महामार्ग चौपदरीकरणाचा मंजुरीसह निर्णय घेतला. त्यासाठी अधिसूचना प्रकाशित झाली. मोजणी सुरू झाली. मात्र, तक्रारी, निधीची चणचण आणि टंगळमंगळ यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. यामुळे केंद्राने नव्याने निविदा काढण्यासह कंत्राटदार नेमणुकीचा निर्णय घेतला आहे. 
धुळे जिल्ह्यात दळणवळण बळकटीकरणाचे प्रकल्प आयते दारात आले. धुळे-नाशिक, धुळे-पळासनेरपर्यंत महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झाले. अमरावती-धुळेमार्गे नवापूरपर्यतच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू झाले आहे. मात्र, धुळे- चाळीसगावमार्गे औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम केवळ टंगळमंगळ चालल्याने दहा वर्षांपासून रखडले आहे. त्यासाठी विविध कारणे पुढे केली जातात. 

नव्याने प्रक्रिया राबविणार 
धुळे-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणासाठी सुनील हायटेक कंपनीची नेमणूक झाली. मात्र, ही कंपनी आर्थिक गुंतवणूक करू शकली नाही. तिला कर्जाऊ निधी मिळू शकला नाही. त्यामुळे केंद्राने या कंपनीला ‘टर्मिनेट’ केले आहे. तसेच तिची बँक ‘गॅरंटी’ जप्त केली आहे. या कंपनीने साधारणतः २०१७ ला काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, तिच्यावर कारवाई झाल्याने केंद्र शासनाकडून येत्या महिन्यात नव्याने निविदा निघणार असून, दोन ते तीन महिन्यांत यथोचित प्रक्रिया राबविल्यानंतर या कामासाठी नव्या कंत्राटदार (एजन्सी) कंपनीची नेमणूक केली जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प कार्यालयाने सांगितले. 

अब्जावधींची गुंतवणूक 
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे ते नाशिकपर्यंत सुमारे ४५० कोटींच्या निधीतून १५० वर किलोमीटर, धुळे ते मध्य प्रदेश सीमेवरील पळासनेरपर्यंत (ता. शिरपूर) सुमारे ३५० कोटींवर निधीतून ९२ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण झाले. तसेच सुमारे साडेपाच हजार कोटींवर निधीतून अमरावती- धुळेमार्गे नवापूर महामार्ग चौपदरीकरणांतर्गत नुकतेच रखडलेले काम सुरू झाले आहे. जिल्ह्याच्या चौफेर दळणवळण बळकटीकरणामुळे नाशिकसह औरंगाबाद, नागपूर आणि मुंबईतील वेळेचे अंतर कमी होऊन बाजारपेठ जवळ येण्यास मदत होत आहे. ही स्थिती औद्योगिकीकरणासह विकासाला पोषक ठरणारी आहे. 

धुळे-औरंगाबादची स्थिती 
धुळे-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणास दहा वर्षांपूर्वी सरासरी ६०० कोटींवर खर्च अपेक्षित होता. विलंबामुळे प्रकल्प किंमत वाढली असून, ती पंधराशे कोटींहून अधिक झाली आहे. या प्रकल्पांतर्गत सरासरी १३६ गावांलगत भूसंपादन, त्यात औरंगाबादसह गंगापूर, खुलताबाद, कन्नड तालुक्‍यातील ७७ गावे, चाळीसगाव (जि. जळगाव) येथील ४० गावे, तर धुळे तालुक्‍यातील सरासरी १२ ते १७ गावांचा समावेश आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule aurangabad four way highway work slow