अंतर्गत वादातून पाच कुटुंब समाजातून बहिष्कृत! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

समाजातील लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधीला हजर राहू न देणे, मुला- मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबाला खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे आदी प्रकारे जातपंचायतीच्या पंचांनी जाच दिल्याची व्यथा तक्रारदार राठोड यांनी मांडली.

 
धुळे : अंतर्गत वादातून खोरदड तांडा (ता. धुळे) येथील बंजारा जातपंचायतीने माझ्यासह कुटुंबाला आणि इतर चार कुटुंबांना बंजारा समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यामुळे आम्हाला शेतात राहावे लागत आहे. आमची ठिकठिकाणी अडवणूक केली जात आहे, अशी गंभीर तक्रार करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित दीपक सोमा राठोड यांनी केली आहे. 

पीडित राठोड यांनी तालुका पोलिस ठाणे आणि "अंनिस'मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. राठोड यांनी तालुका पोलिस ठाण्याने दाद दिली नसल्याची खंत व्यक्त केली. नंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे येथील कार्यालय गाठून आपबिती कथन केली. त्यासह "अंनिस'ने जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली तक्रार अशी ः खोरदड तांडा येथील बंजारा समाज जातपंचायतीने बंजारा समाजातील पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केले आहे. पीडित कुटुंबांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू न देणे, गावात किराणा, औषधे, खरेदी करू न देणे, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणे, समाजातील लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधीला हजर राहू न देणे, मुला- मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबाला खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे आदी प्रकारे जातपंचायतीच्या पंचांनी जाच दिल्याची व्यथा तक्रारदार राठोड यांनी मांडली. "अंनिस'कडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणी "अंनिस'चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जातपंचायतीला मूठमाती अभियान प्रमुख कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश बिऱ्हाडे, जिल्हा सचिव प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, कायदेशीर सल्लागार ऍड. विनोद बोरसे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयाला निवेदन देत खोरदड तांडा येथील बंजारा जातपंचायतीचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी केली. 
 
बहिष्कृत करण्याचे कारण काय? 
खोरदड तांडा येथील एका प्रकरणातील संशयिताला पीडित दीपक राठोड यांच्या नातेवाइकाने जामीन दिला. त्याविषयी नापसंती आणि राग येऊन वीस जणांनी मिळून पीडित राठोड, "त्या' संशयितासह पाच कुटुंबांना आपल्या समाजातून बहिष्कृत केले व शेतात राहण्यास भाग पाडल्याची मूळ तक्रार आहे, असे ऍड. बोरसे यांनी सांगितले. 
 
"त्यांना' बहिष्कृत केलेले नाही.... 
या प्रकरणी खोरदड तांडा येथे संपर्कानंतर शिवाजी राठोड, कैलास राठोड यांनी सांगितले, की आम्ही किंवा आमच्या कुटुंबीयांनी, बंजारा समाज जातपंचायतीने तक्रारदार दीपक राठोड यांच्यासह पाच कुटुंबांना बहिष्कृत केलेले नाही. तसा कुठलाही निर्णय झालेला नाही. "कोरोना'मुळे "ते' पाच कुटुंब शेतात राहात असल्याची माहिती आहे. त्यांची कुणीही अडवणूक केलेली नाही. दरम्यान, शिवाजी राठोड यांना विचारणा केली असता त्यांनी बंजारा समाज गाव नायक मोहन चव्हाण मोबाईल वापरत नसल्याचे सांगितले. 
 
पोलिस अधीक्षकांकडे दाद : ऍड. बोरसे 
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियमानुसार पीडित राठोड यांनी दिलेली तक्रार दखलपात्र आहे. त्यामुळे धुळे तालुका पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त होते. मात्र, तालुका पोलिस ठाण्याने दखल न घेतल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे दाद मागितली आहे, असे "अंनिस'चे कायदेशीर सल्लागार ऍड. विनोद बोरसे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule banjara jat panchayat Excluded five family