धुळेकरांना घराबाहेर पडण्यास मज्जाव, आजपासून ‘जनता कर्फ्यू’ !

निखील सूर्यवंशी
Friday, 24 July 2020

शहरात देखरेखीसाठी महापालिकेची दहा पथके, महसूलचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी गस्त घालतील.

धुळे  : शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शुक्रवारी (ता. २४) दुपारी चारपासून सोमवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंत महापालिकेने जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. देखरेखीसाठी महापालिका आणि महसूल यंत्रणेची पथके स्थापन झाली असून, पोलिसांचीही गस्त असेल. या संदर्भात प्रशासनाची पूर्वतयारी झाली आहे. 

महापालिका प्रशासनाने सहकार्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला आहे. शहरात देखरेखीसाठी महापालिकेची दहा पथके, महसूलचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी गस्त घालतील. जनहिताच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो सर्व घटकांनी यशस्वी करावा, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्‍त अजीज शेख, उपमहापौर कल्याणी अपंळकर यांच्यासह सभापती, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. 

मनपा शुक्रवारी खुली 
महापालिकेतील आयुक्तांच्या दालनाबाहेर कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे महापालिकेचे कामकाज गुरुवारी (ता. २२) एक दिवसासाठी बंद होते. पूर्ण इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यात आले. संबंधित कर्मचारी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वच विभागांत वावरणारा असल्याने त्याचा अनेक ठिकाणी संपर्क आला. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले. खबरदारी म्हणून गुरुवारी दिवसभर महापालिकेचे काम बंद होते. 

गरुडबाग शाखा बंद 
जिल्हा बँकेच्या गरुडबाग शाखेत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे बँकेच्या इमारतीमधील दालने बंद करण्यात आली. गरुडबाग शाखेचे कामकाज तीन दिवस बंद राहील, असे व्यवस्थापनाने सांगितले. कामकाज २७ जुलैला पूर्ववत सुरू होईल. जिल्हा बँकेच्या शाखेत फवारणी करण्यात आली. 

जनता कर्फ्यूत सेवासुविधा काय? 
किराणा, भाजी, फळ विक्री बंद 
सर्व व्यवसाय, हॉकर्सला बंदी 
दवाखाने, मेडिकल दुकाने सुरू 
घरपोच दूध सेवेला परवानगी 
अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींनाच पेट्रोल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule banned from leaving home, 'Janata Curfew' from today!