esakal | कोविड सेंटरवर स्वॅब घेण्यास नकार; शिक्षकांकडून दमदाटीचा प्रकार 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus swab testing

शिक्षकांनी पाण्याच्या गैरसोयीसह गर्दीमुळे उन्हात ताटकळत उभे राहावे लागल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर नियोजनशून्य कामाचा आरोप केला, तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही शिक्षकांवर दमदाटीसह उद्धट वर्तनाचा आरोप केला.

कोविड सेंटरवर स्वॅब घेण्यास नकार; शिक्षकांकडून दमदाटीचा प्रकार 

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : शासनाच्या निर्देशानुसार सोमवार (ता. २३)पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू असून, राज्यभर शिक्षकांची आरटीपीसीआर कोविड चाचणी होत आहे. त्यात सोशल डिस्‍टन्सिंगचा फज्जा उडाला असून, बहुतेक ठिकाणी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी होत आहे. असाच प्रकार भाडणे येथील कोविड सेंटरवर शुक्रवारी (ता.२०) दुपारी घडला. तेथील स्वॅब संकलन पथकप्रमुख तथा जैताणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी काही शिक्षकांवर अरेरावीचे गंभीर आरोप केले असून, जोपर्यंत ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्वॅब घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. 

भाडणे येथील कोविड सेंटरवर पहिल्याच दिवशी १४८, दुसऱ्या दिवशी २८२, तर शुक्रवारी (ता.२०) तिसऱ्या दिवशी ३८७ असे एकूण ८१७ स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी ४०६ अहवाल निगेटिव्ह असून, ४११ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शिक्षकांनी पाण्याच्या गैरसोयीसह गर्दीमुळे उन्हात ताटकळत उभे राहावे लागल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर नियोजनशून्य कामाचा आरोप केला, तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही शिक्षकांवर दमदाटीसह उद्धट वर्तनाचा आरोप केला. शुक्रवारी सकाळी दहापासूनच शिक्षकांची झुंबड उडाली होती. दुपारी चार ते पाचपर्यंत स्वॅब संकलन सुरू होते. मात्र दुपारी बाराच्या दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. त्यामुळे थोड्या वेळासाठी डॉ. चित्तम यांनी काम थांबवून घेतले. दरम्यान, एका शिक्षकास चक्कर आल्याने त्यांना ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून प्रथमोपचार दिले. संबंधित शिक्षकाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे सांगण्यात आले. थोड्या वेळाने या शिक्षकाने स्वॅब दिला. दरम्यान, साक्री पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी दाखल झाल्याने काही काळ तणाव निवळला. 

विद्यार्थ्यांचीही चाचणी करावी 
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका दीपाली भामरे यांनी विद्यार्थी नियमांचे पालन करतील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचीही रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट व्हावी व शिक्षकांना विमाकवचाचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

डॉक्‍टरांची तहसीलदारांकडे तक्रार 
काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात हस्तक्षेप केला. परंतु डॉक्टरांनी स्वॅब घेण्यास सपशेल नकार दिला. डॉ. चित्तम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. के. के. तडवी, डॉ. करिश्मा सोनवणे, डॉ. त्रिलोक भदाणे, आरोग्य कर्मचारी प्रशांत खैरनार, कपिल चव्हाण, एएनएम दीप्ती जाधव, रेखा पवार, श्रीमती राऊत, प्रवीण गांगुर्डे, वैशाली पाठक, बानू खताळ, रेखा नवसारे, आकाश वाघ, योगेश पाठक आदींनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्याकडे तक्रार केली. 

कोविड सेंटर सुरू झाल्यापासून आजतागायत तालुक्यातून एकूण आठ हजार ९०० स्वॅबचे नमुने घेतले. पण अद्याप असा कटू अनुभव आला नव्हता. संबंधित शिक्षकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत काम बंद राहील. मात्र सर्वसामान्यांचे स्वॅब नमुने घेतले जातील. आरोग्य कर्मचारी फुकटचा पगार घेतात, असे म्हणणाऱ्या व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा करणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे. 
- डॉ. हर्षवर्धन चित्तम, वैद्यकीय अधीक्षक 

संपादन ः राजेश सोनवणे