थरारक..बिबट्या शिरला चाळीत; साऱ्यांचाच थरकाप, वासरीला घेवून क्षणात पसार 

दगाजी देवरे
Sunday, 20 September 2020

म्हसदी - चिचंखेडे रस्त्यावरील पाडगण शिवारातील अशोक लकडू पाटील यांच्या रिक्त असलेल्या कांदा चाळीत रात्रीच्या सुमारास बच्छड्यासह बिबट्या बंदीस्त तारेची उसकवत आत शिरला. चाळीत असलेल्या वासरीवर हल्ला चढवत फस्त केली.

म्हसदी (धुळे) : चिचंखेडे (ता.साक्री) येथील पाडगण शिवारात कांदा चाळीत बच्छड्यासह मादी बिबट्याचा रात्रभर मुक्काम. आज सकाळी चाळीतल्या बिबट्याची सर्कस अनेकांनी ‘याची डोळा- याची देही' पाहिली. चाळीत असलेल्या वासरीचा फडशा पाडत सकाळी अनेकांच्या समोर बिबट्या बच्छड्यासह पसार झाला. 

म्हसदी - चिचंखेडे रस्त्यावरील पाडगण शिवारातील अशोक लकडू पाटील यांच्या रिक्त असलेल्या कांदा चाळीत रात्रीच्या सुमारास बच्छड्यासह बिबट्या बंदीस्त तारेची उसकवत आत शिरला. चाळीत असलेल्या वासरीवर हल्ला चढवत फस्त केली. सकाळी रमाकांत अशोक पाटील शेतात गेल्यावर चाळीत मादी बिबट्या बच्छड्यासह असल्याचे निदर्शनास आले.लगतचे शेतकरी गोळा झाल्यावर अनेकांच्या समोर बिबट्या पुन्हा चाळ उसकवत शेतशिवारात पसार झाला. वनविभागास माहिती दिल्यावर वनरक्षक एल. आर. वाघ, कर्मचारी वसंत खैरनार, एकनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. लगतच्या शिवारात सुनिल गोकुळदास बेडसे यांचीही मेढीं बिबट्याने फस्त केल्याची माहिती वनरक्षक वाघ यांनी दिली.

भर दिवसा बिबट्याचा थरार...
भर दिवसा बंदीस्त कांदा चाळीत अनेकांनी बिबट्याचा थरार ‘याची डोळा...याची देही' पाहिला. वनविभागाला माहिती दिली खरी...पण पोलिस किंवा वनकर्मचारी लवकर येतील ते कर्मचारी कसले...? या न्यायाने ते येण्याच्या आतच बिबट्या पसार झाला. वनविभागाने मृत पाळीव प्राण्यांचा पंचनामा केला असला तरी भरपाई कधी मिळेल याची शाश्वती नसल्याचे शेतकरी सांगत होते. दुसरीकडे अशा घटना दिवसागणिक वाढतांना दिसतात.वनविभाग फारसे गांभीर्य घेत नसल्याचे चित्र आहे.किंबहूना वनकर्मचाऱ्यांचे तर नेहमी कानावर हात असतात. आज कालवड, मेंढी फस्त करणारा बिबट्या कोणावरही हल्ला करेल हे नाकारता येणार नाही. सकाळी शेतकऱ्यांच्या समोर पसार झालेला बिबट्या आज त्याच ठिकाणी आहे. म्हणूनच बिबट्यास जेरबंद करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule bibtya attack farm and take the calf and pass in a moment