esakal | आमदार कुणाल पाटलांना ‘मार्केटिंग’ची गरज नाही !

बोलून बातमी शोधा

आमदार कुणाल पाटलांना ‘मार्केटिंग’ची गरज नाही !
आमदार कुणाल पाटलांना ‘मार्केटिंग’ची गरज नाही !
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना कोविडच्या संकटकाळात भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज नाही. ते जनहितासाठी आपली जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. याउलट त्यांच्या नावाने शंख फोडणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपपेक्षा एमआयएमचे येथील आमदार डॉ. फारुक शाह यांचे काम उजवे ठरत असल्याची भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी पत्रकाव्दारे मांडली.

हेही वाचा: राज्याची राजधानी "ना"पास..सातारा आघाडीवर

कोविडप्रश्‍नी भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नुकतेच जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या भेटीला गेले होते. चर्चेनंतर भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आमदार कुणाल पाटील कोविडच्या संकटकाळात नेमके काय करत आहेत, ते दृष्टीपथास पडत नाहीत, तसेच आमदार डॉ. शाह केवळ पत्रकबाजी करत आहेत, अशी टीका प्रसारमाध्यमांसमोर केली होती. या पार्श्वभूमीवर श्री. करनकाळ यांनी दिलेल्या पत्रकात आरोग्य विभागाच्या नियमानुसार कुठल्याही मतदारसंघातील आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार आमदार निधीतील एक कोटीतून आरोग्य केंद्रांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका घेण्यासाठी आमदार पाटील यांनी जिल्हा नियोजन विभागाला मुभा दिली आहे. आमदार पाटील पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात तातडीने कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी सर्वप्रथम आमदार पाटील यांनी केली. आमदार पाटील यांनी जवाहर मेडीकल फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना आधार दिला आहे. तेथील कोविड सेंटरमध्ये माफक दरात उपचार दिले जातात. या सेंटरमध्ये सध्या दोनशे ते तीनशे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात डॉ. शाह यांनी आमदार निधीतून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प, त्यासाठी एमआयडीसीत दोन वर्षे स्वतःची जागा मोफत देण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. वीस लाखांचा निधी रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेण्यासाठी, तर अमरधाममध्ये विद्युत दाहिनींसाठी तीस लाखांचा निधी दिला. यावरून आमदार शाह यांचे काम महापालिकेपेक्षा उजवे ठरते. त्यांच्यावर भाजप तथ्यहीन टीका करत आहे. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सत्ताधारी भाजपने किती रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिले गेले ते जाहीर करावे. भाजपने बहुमताने महापालिकेत सत्ता मिळाली. परंतु, शहराची पूर्ण वाट लावली आहे. यात स्व- विकासावर अधिक लक्ष केंद्रित दिसते. महापालिकेत वर्चस्व गाजविणाऱ्यांनी इतर पक्षातील नेत्यांबद्दल मुक्ताफळे उधळू नयेत, असेही श्री. करनकाळ यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा: महामार्ग चौपदरीकरणाचे कोरोनामुळे यंत्रणा ‘लॉक’, काम ‘डाउन’ !

राज्यावरचे प्रेम गेले कुठे?

महाविकास आघाडी सरकारने उत्तम नियोजनातून कोविड काळात मनुष्यहानी थोपविली आहे. गेल्या वर्षी आघाडीच्या आमदार, खासदारांनी वेतन आणि इतर देणगीही कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली. तेव्हा भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आपले वेतन आणि निधी थेट केंद्र सरकारला दिला होता. तेव्हा कुठे होते भाजपचे महाराष्ट्र प्रेम, असा प्रश्‍न श्री. करनकाळ यांनी उपस्थित केला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे