संवेदनाच बोथट ः असंख्य कोरोना रुग्णांची मृत्यूशी झुंज..जिव वाचविणारे इंजेक्‍शनचाही काळा बाजार ! 

निखिल सूर्यवंशी 
Thursday, 9 July 2020

"रेमडीसीव्हीर' इंजेक्‍शन कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहे. ते कंपनीकडे नसल्यामुळे अडचणी आहेत. राज्याची गरज, पूर्ततेबाबत नियोजनाची माहिती आरोग्य विभागाकडून घ्यावी. "टॉसीलीझूमॅब'प्रश्‍नी लक्ष घालू. 
-डॉ. तात्याराव लहाने 
संचालक, वैद्यकीय शिक्षण, संशोधन मंत्रालय, मुंबई 

धुळे ः राज्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोरोना रुग्णांच्या जिवाचे मोल ठरविणाऱ्या "इंजेक्‍शन'च्या विक्रीत मोठा काळा बाजार सुरू आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात या इंजेक्‍शनचा पुरेसा साठा असणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, खुल्या बाजारात रुग्णाच्या नातेवाइकाला अधिक, तर मुंबई, ठाणे भागात अडीच ते तीनपट पैसे मोजावे लागत आहेत. या लूटमारीमुळे संतापाची लाट उसळली आहे. 

मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोरोना रुग्णाच्या जिवाचे मोल "रेमडीसीव्हीर', "टॉसीलीझूमॅब' इंजेक्‍शन आणि फ्लॅवी फ्लू गोळ्यांवरही अवलंबून असते. कोरोनाची लागण आणि त्यात न्यूमोनिया वाढला, शरीरात पसरला तर संबंधित रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी पर्याय म्हणून या इंजेक्‍शन्सची गरज भासते. त्यामुळे जळगावसह राज्यात या इंजेक्‍शनला मोठी मागणी आहे. 

राज्यात अल्प साठा 
अहमदाबाद आणि हैदराबाद येथील उत्पादक कंपनीकडून "रेमडीसीव्हीर' इंजेक्‍शनचा पुरवठा होतो. असे असताना राज्यात फक्त एक हजार इंजेक्‍शन, तीही मुंबईत उपलब्ध झाली आहेत. एका इंजेक्‍शनची किंमत सरासरी पाच हजार रुपये असून, त्याचा जिल्हा सरकारी रुग्णालयाने कंपनीशी संपर्क साधल्यावर पुरवठा होतो. या इंजेक्‍शनचा पाच ते सहा दिवसांचा डोस देऊन रुग्णाला वाचविण्याचे प्रयत्न होतात. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सरकारी रुग्णालयांची वेळोवेळी "रेमीडीसीव्हीर' इंजेक्‍शनची मागणी नोंदविली आहे. मात्र, अद्याप पुरवठा झालेला नाही. उत्पादक कंपन्यांशी दराबाबत सरकार वाटाघाटी करीत आहे. महाविद्यालयांसह जिल्हा सरकारी रुग्णालयांची परस्पर इंजेक्‍शनची खरेदी केली आणि सरकारने खरेदी किंमत मान्य केली नाही तर? मग जोखीम कोण पत्करेल या विचारातून "रेमडीसीव्हीर'ची खरेदी व पुरवठा रखडला आहे. एकीकडे असंख्य बाधित रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना सरकारच्याही संवेदना बोथट झाल्या की काय, असे म्हणावे लागेल. 

काळा बाजार तेजीत 
रुग्ण चांगला दिसत असला तरी कोरोना विषाणू शरीरात पसरून तो रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. अशा वेळी "टॉसीलीझूमॅब' इंजेक्‍शन दिले जाते. त्याची वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सरकारी रुग्णालयातील किंमत जीएसटीसह 32 हजार रुपये आहे. खुल्या बाजारातही "डीलर प्राइस' 32 हजार रुपये आहे. तेच इंजेक्‍शन विक्रेते 40 हजार 500 रुपयांना विक्री करतात. सरकारकडून घोषित कोविड रुग्णालयात याच इंजेक्‍शनची किंमत सरासरी 45 ते 60 हजारांपर्यंत आहे. मुंबई, ठाण्याकडे तब्बल 70 ते 80 हजार रुपयांना इंजेक्‍शन विक्री होते. संकटकाळात असा काळा बाजार होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये या इंजेक्‍शनचा अल्प साठा उपलब्ध आहे. जळगावसह अनेक जिल्ह्यांत तर साठाही उपलब्ध नाही. ही गंभीर स्थिती, अर्थचक्र थंडावलेले आणि त्यात काळ्या बाजाराला तोंड देताना आपला रुग्ण वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या नातेवाइकाचा व्यवस्थेविरोधातील संताप अनावर होत आहे. याप्रश्‍नी राज्याचे औषध प्रशासनही मूग गिळून आहे. 

 

संपादीत- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Black market of life-saving corona injections too!