तुटवड्यामुळे रक्तासाठी महसूल यंत्रणा सरसावली !

रमाकांत घोडराज 
Saturday, 16 May 2020

बैठकीत किमान 51 जण सोमवार रक्तदान करतील, असा निर्णय झाला. कृषी विभागाच्या संघटनेने सोमवारी रक्तदानात शिबिरात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

धुळे : जिल्ह्यात विविध आपत्तीच्या काळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या महसूल विभागाने आता गरजूंसाठी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार (ता. 18) सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात रक्तदान शिबिर होईल. जिल्हाधिकारी संजय यादव रक्तदान करून शिबिराचे उदघाटन करतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. 

जिल्ह्यालाही रक्ताचा तुटवडा भासत आहे. "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह विविध कायद्यांची अंमलबजावणी महसूल विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यातच कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. महसूल विभागाचे अधिकारी, महसूल कर्मचारी संघटना, महसूल तलाठी, मंडळ अधिकारी, पटवारी संघटनेने रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी संघटनांची बैठक आज झाली. बैठकीत किमान 51 जण सोमवार रक्तदान करतील, असा निर्णय झाला. कृषी विभागाच्या संघटनेने सोमवारी रक्तदानात शिबिरात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी रक्तदान करून रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule blood bank stok Shortages pushed revenue system