esakal | सेसप्रश्‍नी व्यापाऱ्यांचा ‘बंद' खानदेशात १५ कोटींची उलाढाल ठप्प 
sakal

बोलून बातमी शोधा

सेसप्रश्‍नी व्यापाऱ्यांचा ‘बंद' खानदेशात १५ कोटींची उलाढाल ठप्प 

केंद्र व राज्य शासनाने नवीन अध्यादेश काढला आहे. त्यात शेतीमालाची विक्री बाजार समितीत झाली तर मार्केट सेस, देखरेख खर्च, इतर खर्च लागेल.

सेसप्रश्‍नी व्यापाऱ्यांचा ‘बंद' खानदेशात १५ कोटींची उलाढाल ठप्प 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे  ः सेसप्रश्‍नी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते, खरेदीदारांनी मंगळवारी (ता. २५) एकदिवसीय ‘बंद' पुकारला होता. त्यास खानदेशातील सरासरी तीन हजार अडतदार, खरेदीदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे शेतमालाचा व्यवहार ठप्प झाला. तसेच खानदेशात सुमारे दहा ते पंधरा कोटींची उलाढाल होऊ शकली नाही, अशी माहिती खानदेश व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय चिंचोले यांनी दिली. 

श्री. चिंचोले म्हणाले, की कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांनी बाजार समितीमधील मार्केट यार्डवरील जाचक कायद्यात बदल केला आहे. शिवाय सेस कमी केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सेस कमी करावा, या मागणीसाठी खानदेश व्यापारी संघटना मंगळवारी राज्यव्यापी बंद आंदोलनात सहभागी झाली. याव्दारे शासनाचे लक्ष वेधले. 

व्यापाराचा प्रश्‍न 
केंद्र व राज्य शासनाने नवीन अध्यादेश काढला आहे. त्यात शेतीमालाची विक्री बाजार समितीत झाली तर मार्केट सेस, देखरेख खर्च, इतर खर्च लागेल. तसेच शेतीमाल बाहेर विक्री केला तर त्यावर कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्याचा परिणाम बाजार समितीतील व्यापारावर होणार आहे. या पद्धतीने व्यापार सुरू राहिला तर व्यापाऱ्यांवर, या अवलंबून बाजार समितीमधील विविध घटकांवर मोठे आर्थिक संकट कोसळेल. त्यात परदेशी गुंतवणूक येऊ घातल्याने स्थानिक व्यापारी स्पर्धा करू शकणार नाही. त्याचा परिणाम मार्केट यार्डातील लहान व्यापारी, लहान व मोठे शेतकरी, कर्मचारी, गुमास्ता, हमाल, मापाडी, अडत्यांवर होईल. त्यामुळे आपल्याकडील जाचक कायद्यात बदल करावा, सेस कमी करावा, अशी मागणी खानदेश व्यापारी संघटनेने लावून धरली आहे. 

खानदेशातील प्रयत्नशील 
खानदेशात संघटनेने जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, बाजार समिती सभापती, तालुका उपनिबंधक, प्रांताधिकारी आदींना मागण्यांचे निवेदन दिले. बंद यशस्वी होण्यासाठी धुळे येथे अध्यक्ष विजय चिंचोले, नरेंद्र हेमबाडे, प्रमोद जैन, अमळनेर येथे हरिभाऊ वाणी, वृषभ पारख, शिरपूर येथे कैलास अग्रवाल, युवराज जैन, दोंडाईचा रमेश लखोटे, राहुल कवाड, नंदुरबार येथे किशोर वाणी, जळगाव येथे अशोक राठी, चाळीसगाव येथे बन्सीलाल दलीचंद, हेमंत वाणी, अनिल चौधरी, पाचोरा येथे भरत शेंडे, देवेंद्र कोटेचा, पारोळा येथे संदेश शेंडे, जितेंद्र शेवाळकर यांनी प्रयत्न केले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रती शंभर रुपयांसाठी एक रुपया पाच पैसे सेस आकारला जातो. यात एक रुपया मार्केट फी, पाच पैसे देखभाल खर्च असतो. तो रद्द करावा, अशी मागणी आहे. सेस खरेदीदार म्हणजेच व्यापाऱ्याला भरावा लागतो. बंदला खानदेशात सरासरी अडीच ते तीन हजार अडतदार, खरेदीदारांना प्रतिसाद दिला. संघटनेत खानदेशातील ३३ कृषी उत्पन्न बाजार समित्या समाविष्ट आहेत. 
- विजय चिंचोले 
अध्यक्ष, खानदेश व्यापारी संघटना 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image