esakal | धुळ्याच्या‘सिव्हिल’च्या लपवाछपवीवर नाराजीची लाट! 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्याच्या‘सिव्हिल’च्या लपवाछपवीवर नाराजीची लाट! 

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा सर्वोपचार रुग्णालय चक्करबर्डीत स्थलांतरित झाल्यावर ‘सिव्हिल’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे, अशी सर्वपक्षीय मागणी झाली.

धुळ्याच्या‘सिव्हिल’च्या लपवाछपवीवर नाराजीची लाट! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे  ः कोरोनाशी मुकाबला करताना गरीब, गरजू रुग्णांना सरकारी, खासगी रुग्णालयांत खाटा मिळत नसल्याने अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यात खासगी रुग्णालयांमध्ये आरक्षित खाटांची सुविधा उपलब्ध करताना जिल्हा प्रशासनाने सरासरी तीनशे ते चारशे खाटा निर्मितीची क्षमता असलेल्या साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयाकडे का दुर्लक्ष केले, असा प्रश्‍न वैद्यकीय पातळीवरून उपस्थित होत आहे. ‘सिव्हिल’मध्ये सोयी-सुविधांसाठी पुरेशी जागा असूनही लपवाछपवी केली जात असल्याने खासगी, वैद्यकीय क्षेत्रात तीव्र नाराजीची लाट आहे. 

‘सिव्हिल’ला साडेतीन कोटी 
महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयातील खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित केल्या जात आहेत. त्यात काही रुग्णालयांचाच समावेश आहे. अन्य खासगी रुग्णालये राजकीय हस्तक्षेपामुळे खाटा आरक्षणाच्या यादीत समाविष्ट न झाल्याने या वर्तुळात असंतोषाचे वातावरण आहे. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा सर्वोपचार रुग्णालय चक्करबर्डीत स्थलांतरित झाल्यावर ‘सिव्हिल’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे, अशी सर्वपक्षीय मागणी झाली. तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘सिव्हिल’चे लोकार्पण करत श्रेय घेतले. त्या वेळी साडेतीन कोटींच्या निधीतून ‘सिव्हिल’च्या इमारतींचे रंगरंगोटीसह नूतनीकरण झाले. सिटी‌ स्कॅनसह काही सुसज्ज, अद्ययावत सोयी-सुविधा, ऑपरेशन थिएटर झाले. डॉक्टरांसह कर्मचारी वर्ग देण्यात आला. 

‘सिव्हिल’ची लपवाछपवी का? 
असे असताना ‘सिव्हिल’मध्ये २२ मार्चच्या लॉकडाउनपासून आतापर्यंत केवळ ६० खाटाच कशा कार्यरत राहिल्या?, ओरड सुरू झाल्यावर महापालिकेने ‘सिव्हिलव’मधील कान- नाक- घसा कक्ष, बालरुग्ण कक्षात मिळून नुकतेच ऑक्सिजनयुक्त ६० खाटा तयार केल्या. याचा अर्थ शंभरापेक्षा अधिक खाटा ‘सिव्हिल’मध्ये अद्याप पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मग शासनाने कोविडप्रश्‍नी कोट्यवधींचा निधी देऊनही आतापर्यंत सरासरी तीनशे ते चारशे खाटांची क्षमता असलेल्या ‘सिव्हिल’कडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले? जिल्हाधिकारी, आमदारांनी आजही संबंधित कक्षाचे कुलूप तोडून तपासणी केली तर ते सुसज्ज व केवळ डीपीअभावी वापरात नसलेले सिटी स्कॅन मशिन, प्रसूती कक्षाची ओटी रूम वापरात आणल्याशिवाय राहणार नाहीत. रंगरंगोटी केलेले विविध कक्ष, रूम वापरात आणले तर खासगी रुग्णालयांपेक्षा अधिक खाटांची सुविधा ‘सिव्हिल’ला उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. 

यादवांच्या समक्ष ‘लॉक’ तोडले... 
‘सिव्हिल’मधील लपवाछपवीनंतर अधिक ओरड होऊ नये म्हणून प्रथम कान-नाक-घसा, बालरुग्ण विभागाची रंगरंगोटीची, प्रसाधनगृह, पंखे आदींसह विविध सोयी-सुविधा असलेली मोठी रूम कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला. तेव्हा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या समक्ष या बंद विभागाचे ‘लॉक’ तोडून पाहणी झाली. तेव्हा चांगली व्यवस्था पाहून मी अशा रूममध्ये झोपेल, अशी प्रतिक्रिया श्री. यादव यांनी व्यक्त केली. मग पाच महिने ही सध्याची त्रोटक व्यवस्था उभारायला विलंब का लागला, असा वर्तुळात प्रश्‍न आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे 

loading image