esakal | धुळेकरांचा बिनधास्तपणा धोकादायक; दिलासादायक स्थिती नियंत्रणातच ठेवण्याची गरज 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळेकरांचा बिनधास्तपणा धोकादायक; दिलासादायक स्थिती नियंत्रणातच ठेवण्याची गरज 

कोरोनाबाधितांच्या आकड्याने अडीचशेचा टप्पाही गाठला होता. दीडशे ते दोनशे बाधितांचा आकडा तर नित्याचाच होता. बळींचा आकडाही रोज चार ते नऊपर्यंत होता. काही दिवसांपासून हे चित्र बदलले आहे. ए

धुळेकरांचा बिनधास्तपणा धोकादायक; दिलासादायक स्थिती नियंत्रणातच ठेवण्याची गरज 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः जिल्ह्यातील कोरोनाबाधित व कोरोनाबळींचा आलेख खाली आल्याचे समाधान असले तरी धाकधूक कायम आहे. विशेषतः नागरिकांच्या बिनधास्त व बेफिकीरपणामुळे समाधानाची स्थिती कधी पालटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे धुळेकरांसह जिल्हावासीयांनी समंजसपणा दाखविण्याची गरज आहे. सहा महिन्यांपासून अतिशय गंभीर परिस्थितीशी मुकाबला करताना पोळून निघालेल्या यंत्रणेलाही अशा समंजसपणाची अपेक्षा आहे. बेफिकिरी कायम राहिली, तर मात्र निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. सहा महिन्यांत हा विळखा घट्ट झाला. कोरोनाशी लढताना आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस प्रशासनाची पुरती दमछाक झाली. खुद्द नागरिकही त्रासले आहेत. कोरोनाचे संकट कधी जाईल, या आशेवर सर्वजण आहेत. अनलॉकनंतर बाधित व बळींची संख्या आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेला परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागली. या परिश्रमाचे फळ व सुजाण नागरिकांच्या पाठबळामुळे काही दिवसांपासून बाधितांसह बळींची संख्या घटली आहे. 

बिनधास्तपणा धोकादायक 
मधल्या काळात कोरोनाबाधितांच्या आकड्याने अडीचशेचा टप्पाही गाठला होता. दीडशे ते दोनशे बाधितांचा आकडा तर नित्याचाच होता. बळींचा आकडाही रोज चार ते नऊपर्यंत होता. काही दिवसांपासून हे चित्र बदलले आहे. एकूणच चित्र जिल्ह्यासाठी दिलासा देणारे असले, तरी या दिलासादायक चित्रामागे गंभीर धोका लपला आहे. नागरिकांचे बिनधास्तपणे बाहेर फिरणे, गर्दी करणे यामुळे कधी संसर्गजन्य कोरोनाचा उद्रेक होईल, हे सांगता येत नाही. 

बच्चेकंपनीही बाहेर 
सायंकाळी व रात्रीही फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी तर लहान मुलांना घेऊन काहीजण बिनधास्तपणे फिरताना दिसतात. विशेष म्हणजे, त्यांच्या तोंडावर मास्कही नसतो. 

बाजारातही बेफिकिरी 
शहरात विविध ठिकाणी भाजीपाल्यासह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसते. मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड, पाचकंदील, देवपूरमध्ये रस्त्याच्या कडेला रोज होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. दुकानदारांसह ग्राहक कोरोनाचा धोका विसरले की काय, अशी स्थिती दिसते. विशेष म्हणजे, सायंकाळी सातनंतर सर्व व्यवहार बंद होणे अपेक्षित असताना दुकाने सुरू दिसतात. 


- विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा 
- लक्षणे नसलेले अनेकजण गर्दीत असण्याची शक्यता 
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वयंघोषित निगेटिव्ह असलेल्यांचा वावर 
- होम क्वारंटाइन असलेल्यांचा सर्रास बाहेर वावर 
- लहान मुलांना बाहेर फिरवणे, गर्दीत नेण्याचे वाढते प्रकार 
- अनेक महाभाग तर नेमके शिंकतानाच काढून घेतात मास्क 
- स्थिती पाहता यंत्रणेलाही सजग, पुन्हा कारवाईचा बडगा उचलण्याची गरज 

हे चित्र लक्षात असू द्या..
- एकूण बाधित- १२,३०९ 
- एकूण मृत्यू- ३६२ 
- धुळे मनपा क्षेत्रात- १६० 
- उर्वरित जिल्ह्यात- २०२ बळी 

loading image
go to top