चोरट्यांचा धुळ्यावर ताबा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

धुळे : शहरासह परिसरात आठवड्यापासून सलग चोरीचे सत्र सुरू असल्याने चोरट्यांनी शहरावर ताबा घेतल्याचे चित्र आहे. याप्रश्‍नी गाफील पोलिस यंत्रणा अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर यथोचित उपाययोजनांच्या नियोजनात व्यस्त असल्याने चोरट्यांनी ही संधी साधत जनतेच्या रक्षणकर्त्या हवालदारांसह विविध व्यावसायिकांकडे हातसफाईचे सत्र अवलंबिले आहे. त्यातून दागदागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. चोरीच्या सत्रामुळे धुळेकर भयभीत आहेत. 

धुळे : शहरासह परिसरात आठवड्यापासून सलग चोरीचे सत्र सुरू असल्याने चोरट्यांनी शहरावर ताबा घेतल्याचे चित्र आहे. याप्रश्‍नी गाफील पोलिस यंत्रणा अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर यथोचित उपाययोजनांच्या नियोजनात व्यस्त असल्याने चोरट्यांनी ही संधी साधत जनतेच्या रक्षणकर्त्या हवालदारांसह विविध व्यावसायिकांकडे हातसफाईचे सत्र अवलंबिले आहे. त्यातून दागदागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. चोरीच्या सत्रामुळे धुळेकर भयभीत आहेत. 

मोराणेनंतर चोरट्यांनी शहरात साक्री रोड, मिल परिसराकडे मोर्चा वळविला. यात साक्री रोडवरील जनरल अरुणकुमार वैद्यनगरातील श्री साई अपार्टमेंटमधील हवालदाराचे घर आणि ज्वेलर्सचे दुकान लक्ष्य केले. तसेच मिल परिसरातील घरावर डल्ला मारला. या तीन घटनांमध्ये दागदागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊनही चोरीचे सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. 

हवालदाराकडे हातसफाई 
आर्वी पोलिस दूर क्षेत्रात हवालदार भिकाजी आर. पाटील हे कार्यरत आहेत. ते गुरुवारी आर्वी येथे रात्री नियमित कामकाजात व्यस्त होते. त्यांचे कुटुंबीय दिवाळीनिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यामुळे रात्री वैद्यनगरातील त्यांचे घर कुलूप बंद होते. शुक्रवारी पहाटे पावणेसहाला चार चोरट्यांनी श्री साई अपार्टमेंटच्या गेटचे कुलूप तोडून पाटील यांच्या घरात प्रवेश केला. तेथून दोन तोळे वजनाची सोनपोत, पाच ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पट्टीसह 20 हजारांची रोकड, असा एकूण 97 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

तीन ठिकाणी डल्ला 
हवालदाराच्या घरापासून काही अंतरावर पुखराज रामकरण वर्मा यांच्या मालकीचे सिद्धिविनायक बेन्टेक्‍स ऍण्ड ज्वेलर्सचे दुकान आहे. त्याचे शटर उचकटून चोरट्यांनी बेन्टेक्‍सचे दागिने, राशीचे खडे, असा 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तिसरी चोरी मिल परिसरातील अहिल्यादेवी नगरात सुनील रामचंद्र सोनार यांच्याकडे केली. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातून चांदच्या पाटल्या, चांदीची लक्ष्मी, असा 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोनार कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपले असताना ही चोरी झाली. 

चौघे चोरटे सीसीटीव्हीत कैद 
श्री साई अपार्टमेंटमधील चोरीवेळी तोंड झाकून असलेले चौघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. त्यात हवालदार पाटील यांच्या घरातून अकरा मिनिटांनंतर ते बिनदिक्‍कतपणे बाहेर पडत असल्याचे दिसून येते. गेटबाहेरील कारमधून चौघे चोरटे फरार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 
 
आठवड्यातील चोरीच्या अशा घटना, लंपास ऐवज रुपयांत 
2 नोव्हेंबर...स्वामी विवेकानंद सोसायटी........1, 32, 500 
3 नोव्हेंबर...वडेल परिसरात.......................2, 47,000 
4 नोव्हेंबर...रागरंग कॉलनी........................40,000 
5 नोव्हेंबर...शंकर होम अप्लायन्स...............4,000 
6 नोव्हेंबर...महावीर सोसायटी, वल्लभ नगर....90,000 
7 नोव्हेंबर...मोराणे प्र- लळिंग शिवार............2, 56,000 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule city gharfodi weak