शाळा राहणार बंदच; मुलांना पाठविण्यास पालकच अनुत्‍सुक

रमाकांत घोडराज
Monday, 30 November 2020

शाळा सुरू करण्यासाठी शासन-प्रशासनाकडून तयारी होत असली तरी पालक मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे दिसते. 
कोरोना संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत.

धुळे : राज्य शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा; पण कोरोना विषाणू संसर्गाच्या छायेखाली पाल्यांना शाळेत पाठविण्यास बहुतांश पालकच अनुत्सुक आहेत. धुळे शहरातील साधारण २८ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच हजार २०० विद्यार्थ्यांच्या पालकांनीच संमतिपत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. संमतिपत्रांची ही आकडेवारी पाहता शाळा सुरू करण्यासाठी शासन-प्रशासनाकडून तयारी होत असली तरी पालक मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे दिसते. 
कोरोना संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता सर्वच व्यवहार, आस्थापना सुरू झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा विचारही पुढे आला. राज्य शासनाच्या निर्णयानुसार नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते. मात्र, जिल्ह्यातील एकही शाळा त्या दिवशी सुरू झाली नाही. दरम्यान, त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणेची बैठक घेतली. तीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी केलेल्या तयारीची पाहणी करून ३० नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते. अहवालाचे अवलोकन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने धुळे महापालिका क्षेत्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेऊन चर्चा केली होती. 

अहवाल प्राप्त 
दरम्यान, २६ व २७ नोव्हेंबरला शिक्षण विस्ताराधिकारी, प्रशासन अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आदींच्या पथकाने शहरातील शाळांना भेटी देऊन तयारीची पाहणी केली. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची उपलब्धता आदी विविध बाबींची यात तपासणी करण्यात आली. शाळाभेटीचा सर्व शाळांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्याचे एकत्रिकरणही झाले आहे. हा अहवाल आता जिल्हाधिकाऱ्यांपुढे सादर होईल. 

संमतिपत्र तुलनेने नगण्य 
पथकांनी २६ व २७ नोव्हेंबरला दिलेल्या भेटीपर्यंत धुळे शहरातील ९० शाळांकडे ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची संमती दिली आहे, त्याचीही माहिती घेण्यात आली. यात एकूण २८ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच हजार २०० विद्यार्थ्यांच्या पालकांनीच संमतिपत्र दिले आहे. एकूण विद्यार्थी व संमतिपत्रांची संख्या पाहता पालकच आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे यातून पाहायला मिळते. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या बैठक 
शाळाभेटी, तपासणीचा अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश होते. याबाबत सोमवारी (ता.३०) जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होती. मात्र, ही बैठक आता मंगळवारी (ता. १) होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागून आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule city parents are reluctant to send their children