धुळ्यातील सरकारी रुग्णालयात ‘बेड’ची मारामार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

कोरोनाप्रश्‍नी शहरासह जिल्ह्यातील अधिकतर रुग्ण जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात धाव घेत आहेत. तेथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूची सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, महागडी इंजेक्शन्स, औषधे मोफत उपलब्ध असल्याने रूग्णसंख्या वाढते आहे.

धुळे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील येते १५ दिवस चिंतेचे असतील, असे ‘सकाळ’ने दोन दिवसांपूर्वीच निदर्शनास आणले होते. त्याचा प्रत्यय गुरुवार (ता. ३०)पासून सरकारी रुग्णालयात येण्यास सुरवात झाली आहे. यात चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध २७० पैकी २६३ खाटा (बेड) फुल झाल्या आहेत. तशीच गत साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयाची (सिव्हिल) झाली आहे. कोरोनाबाधित, संशयित रुग्णांची वाढती संख्या आणि त्यात बेडची मारामार सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 
कोरोनाप्रश्‍नी शहरासह जिल्ह्यातील अधिकतर रुग्ण जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात धाव घेत आहेत. तेथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूची सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, महागडी इंजेक्शन्स, औषधे मोफत उपलब्ध असल्याने रूग्णसंख्या वाढते आहे. हा भार आता हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयास पेलवेनासा झाला आहे. त्यामुळेच हिरे महाविद्यालय आणि `सिव्हिल`मध्ये तू तू- मै मै होऊ लागले आहे. 

हिरे मेडिकलचा गंभीर प्रश्‍न 
हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात केवळ `क्रिटीकल`, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी सॅच्युरेशन असलेले, न्यूमोनिया बळावलेले, आयसीयूसह व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवर उपचार अपेक्षित आहे. मात्र, यासह विविध रुग्ण अधिक प्रमाणात या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे भार वाढत आहे. परिणामी, सर्व बेड फुल्ल झाले आहेत. गुरूवारी रात्रीतून रूग्णसंख्या वाढल्यास त्यांना कुठे दाखल करावे, असा गंभीर प्रश्‍न हिरे महाविद्यालयाला पडला आहे. अशावेळी ऑक्सिजनचे ९० वरील प्रमाण असलेल्या रुग्णांना `सिव्हिल`मध्ये, तसेच महापालिका, जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालय, पालिकांच्या रुग्णालयात व इतर कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा उपलब्ध केली जावी, प्रसंगी ऑक्सिजन सिलिंडरव्दारे गरजू रुग्ण हाताळले जावे, असे हिरे महाविद्यालयास वाटते. 

`सिव्हिल`, मनपाची स्थिती 
`सिव्हिल`मध्ये ६० खाटा असून सरासरी १२ ते १३ बेडला ऑक्सिजन पॉइंट आहेत. ते वापरात आहेत. शिवाय रोटेशनप्रमाणे ५० ऑक्सिजन सिलिंडरचा वापर झाला आहे. याशिवाय महापालिकेच्या पॉलिटेक्निक कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यासह सरासरी तीनशे खाटांची सुविधा उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात हे सेंटर लांब असल्याचे कारण सांगत अनेक रुग्ण हिरे महाविद्यालयाकडे धाव घेत आहेत. `सिव्हिल`ला जागा मिळाली तर तेथे उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर असले तरी त्यांचाही भार वाढता आहे. अशा कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्धतेची गरज निर्माण झाली आहे. अशा विचित्र स्थितीमुळे सरकारी रुग्णालये, कोविड केअर सेंटरमधील सुविधांना मर्यादा, प्रसंगी सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे `बेड`ची मारामार सुरू झाल्याचे चित्र आहे. 
 
क्षमता वाढीसाठी प्रयत्न व्हावे 
हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन पॉइंट असलेले १२५ बेड फुल्ल झाले आहेत. याशिवाय अधिक ५० रुग्णांना ही सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच ३२ पैकी १८ व्हेंटिलेटरवर रुग्णांना उपचार दिले जात आहेत. यात १४ व्हेंटिलेटर बसविण्याचे काम प्रगतीत आहे. आयसीयूमध्ये ३५ बेड असून या कक्षावरही भार आहे. महाविद्यालयातील डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र सेवेत गुंतले आहे. अधिक लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये पाठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भार वाढत असल्याने ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. जेणेकरून गरजेच्या रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. यात मोठी कसरत होत असल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule civil hospital and medical collage no bed in corona patients