esakal | धोका टळलेला नाही, सर्व नियम काटेकोरपणे पाळा : जिल्हाधिकारी यादव
sakal

बोलून बातमी शोधा

dhule collector sanjay yadav

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ हजार ७८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यात सर्वाधिक आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही.

धोका टळलेला नाही, सर्व नियम काटेकोरपणे पाळा : जिल्हाधिकारी यादव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातर्फे सर्व प्रयत्न होत आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत असले, तरी कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा नियमितपणे व कटाक्षाने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
 
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ हजार ७८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यात सर्वाधिक आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही. राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेच्या कालावधीत एकूण दोन वेळेस आरोग्य स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. कोरोना विषाणूवर हमखास असा तोडगा सापडून त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत जीवनशैलीत काही बदल करणे सर्वांनाच आवश्यक झाले आहे. त्यात मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर या पलीकडे आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात नवीन बदलांचा अवलंब करणे गरजेचे आहे. अशा बदलांचा स्वीकार करून त्या माध्यमातून कोरोना विषाणूवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे श्री. यादव यांनी म्हटले आहे. 

संसर्ग रोखण्यासाठी हे करा 
कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो वेगवेगळ्या स्वरूपाचे मास्क वापरावेत, स्वत:च्या मास्कला वेगळी खूण करावी, एकमेकांचे मास्क वापरू नयेत, पुरेसा व योग्यवेळी आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योग, प्राणायाम करून प्रतिकार शक्ती वाढवावी, वाहन चालविताना किंवा प्रवास करताना मास्कचा वापर करावा, बंदिस्त वातावरण, गर्दीत जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, दरवेळी बाहेरून किंवा कार्यालयातून घरी परतल्यावर सर्वप्रथम आंघोळ करावी, कपडे धुण्यासाठी थेट एका बादलीत टाकावेत, कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली, तर कोणाकोणाला भेटलो याची नोंद ठेवावी, कौटुंबिक स्तरावर वावरताना कोरोना विषयक सूचनांचे उल्लंघन होत असल्यास ते एकमेकांच्या निदर्शनास आणावे, मोबाईलसारख्या वस्तू नियमितपणे स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी, भाज्या-फळे स्वच्छ धुऊन ठेवावेत. त्यानंतरच त्यांचा आहारात वापर करावा, खरेदीला शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने जावे, दुकान किंवा दुकानाबाहेरही सुरक्षित अंतर ठेवावे, कठड्यांना स्पर्श करू नये, कार्यालयात कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवावे, वाहनांमध्ये दाटीवाटीने प्रवास करू नये. 

loading image
go to top