esakal | संपादीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यातही राजकीय श्रेय
sakal

बोलून बातमी शोधा

compensation for acquired land

तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ प्रकल्प भरण्याच्या योजनेचे काम गतिमान आहे. त्यासाठी जामफळ लगतच्या सुमारे 488 शेतकऱ्यांची 1200 एकर शेती संपादित झाली आहे.

संपादीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यातही राजकीय श्रेय

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : जामफळ धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादीत झाल्या असून अद्यापही शेतीचा मोबदला मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असून शेतीचा मोबदला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र तेथेही श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. 
गेल्या आठवड्यात खासदार सुभाष भामरे व प्रा. अरविंद जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मोबदल्यासंदर्भात जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. पुन्हा शुक्रवारी आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी यादव यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याचे श्रेय मिळविण्यासाठी राजकारण सुरू असून बहुतांश शेतकरींचे राजकारणाशी घेणे- देणे नसून पुरेसा म्हणजे बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळावा अशी त्यांची अपेक्षा व मागणी आहे.

४८८ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत
तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ प्रकल्प भरण्याच्या योजनेचे काम गतिमान आहे. त्यासाठी जामफळ लगतच्या सुमारे 488 शेतकऱ्यांची 1200 एकर शेती संपादित झाली आहे. त्यापैकी सोनगीर शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. मात्र सोंडले शिवारातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून शेतीचा मोबदला न मिळाल्याने व दोन वर्षे कोणतेही पीक घेता न आल्याने सोंडले शिवारातील हवालदिल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेकदा चकरा मारल्या. पण फक्त आश्वासन मिळाले. 

केवळ आश्‍वासन
दरम्यान भाजपाला मानणाऱ्या काही शेतकऱ्यांनी भाजपाचे जिल्हानेते प्रा. अरविंद जाधव यांची भेट घेतली. त्यांनी खासदार सुभाष भामरे यांचेमार्फत जिल्हाधिकारींकडे गेल्या शुक्रवारी (ता. 4) बैठक घेतली. 269 कोटी रुपये निधी प्राप्त झाल्याचे व एका महिन्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे आश्वासन मिळाले. मात्र शेतजमिनीला काय भाव मिळेल हे जाहीर झाले नाही. दरम्यान काँग्रेसला मानणाऱ्या काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन पुरेसा मोबदला मिळण्याबाबत चर्चा केली. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांसह शुक्रवारी (ता. 11) जिल्हाधिकारी यादव यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळावा अशी मागणी केली. बाजारभावाच्या चारपट मोबदला न मिळाल्यास एक इंच शेती देणार नाहीत असे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मोबदला मिळण्याबाबतही राजकारणाचा शिरकाव झाल्याने दोन वर्षे राजकीय मंडळी कुठे होती? यापुर्वी शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले होते? असा प्रश्न विचारला जात आहे. राजकारण खुशाल करा पण आम्हाला मोबदला लवकर मिळवून द्या अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image