नियम मोडण्याचा बेजबाबदारपणा नडला; आणि धुळेकरांनी मोजला ‘साडेपाच लाख रुपयांचा दंड 

रमाकांत घोडराज
Tuesday, 8 September 2020

नियम पाळण्याचे आवाहन आजही होत आहे. दरम्यान, आवाहन, विनंती करुनही जे नागरिक ऐकत नाहीत, त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई झाली,

धुळे ः कोरोना विषाणू संसर्गाचे संकट सुरू झाल्यानंतर या संकटाला रोखण्यासाठी अथवा किमान नियंत्रणात ठेवण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यासाठी जे नियम-अटी घालून दिलेल्या आहेत, त्यांचे पालन करण्याचे आवाहन, जनजागृती प्रशासनाकडून होत आहे. त्यानंतरही जे नागरिक ऐकत नाहीत त्यांच्यावर कठोर भूमिका घेऊन दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. या दंडात्मक प्रक्रियेत गेल्या पाच महिन्यात महापालिकेच्या यंत्रणेने तब्बल पाच लाख ६४ हजार रुपये दंड वसुली केली. ही कारवाई आत्ताही सुरू आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने गर्दी होणार नाही यासाठी फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे बंधन घातले. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकण्यास मनाई केली, मास्क लावणे बंधनकारक केले. हे नियम सर्वच ठिकाणी लागू केले. विशेषतः बाजारात येणाऱ्या नागरिकांनी हे नियम पाळणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासनासह विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी आदींकडून आवाहन करण्यात आले, जनजागृती करण्यात आली. पाच महिन्यांपूर्वी संसर्गाचा धोका जसा होता त्यापेक्षा अधिक धोका सद्यःस्थितीत वाढलेला आहे. कोरोनाबाधितांची व कोरोनाबळींची संख्यांही दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय अनलॉक झाल्यामुळे बाजारातही गर्दी वाढली आहे. त्यामुळे नियम पाळण्याचे आवाहन आजही होत आहे. दरम्यान, आवाहन, विनंती करुनही जे नागरिक ऐकत नाहीत, त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई झाली, आजही सुरू आहे. 

साडेपाच लाखांवर दंड 
फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्या, रस्त्यावर थुंकणाऱ्या, मास्क न लावणाऱ्या नागरिक, व्यापारी, फेरीवाले आदींकडून महापालिकेच्या पथकांनी दंड वसुली केली. २० एप्रिल ते ३१ ऑगस्ट या पाच महिन्यात पथकांनी तब्बल पाच लाख ६४ हजार रुपये दंड वसुली झाली आहे. यात प्रामुख्याने एप्रिलमध्ये आठ, मेमध्ये बारा, जूनमध्ये सात, जुलैमध्ये आठ व ऑगस्टमध्ये चार दिवसांत ही दंड वसुली झाली आहे. त्यातही ४ मेस ४१ हजार ८००, ५ मेस ३६ हजार ८००, १९ मेस २५ हजार, २० मेस २६ हजार १००, ३० जूनला २२ हजार ९००, ६ जुलैला २८ हजार ८००, ४ ऑगस्टला तब्बल ९३ हजार ३०० अशी दंड वसुली झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसते. 
 

अनलॉकनंतर आवाहनावर भर 
लॉकडाऊनच्या काळात दंड वसुली मोठ्या प्रमाणावर झाली. अनलॉक झाल्यानंतर मात्र साधारण सर्वच व्यवहार सुरू झाल्याने बाजारात गर्दी वाढली आहे. अशा स्थितीत महापालिकेकडून दंडात्मक वसुलीपेक्षा आवाहन करण्यावर भर आहे. सोमवारी (ता.७) सायंकाळी सहानंतरही दुकाने उघडी असल्याने महापालिकेच्या पथकाला आग्रारोड, पारोळारोड, जेबी रोड, खोलगल्ली आदी भागात जाऊन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागले. 

दंड वसुली अशी... 
-फिजिकल डिस्टन्स न पाळणे...२, ७३, ५०० 
-रस्त्यावर थुंकणे.................... २९,३०० 
-मास्क न लावणे................ २, ६१,२०० 
-एकूण..................... ५, ६४, ००० रुपये 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Corolla defense rules broke the rules five lakhs recovered from the Municipal Corporation