esakal | सोनगीर व्यापारीपेठेला ‘कोरोना’चा फटका;  ५० कोटींचे नुकसान   
sakal

बोलून बातमी शोधा

सोनगीर व्यापारीपेठेला ‘कोरोना’चा फटका;  ५० कोटींचे नुकसान    

२४ मार्च ते ८ जूनदरम्यानच्या लॉकडाउन काळात सर्वच व्यवसाय ठप्प होते. मात्र, तोपर्यंत येथे एकही ‘कोरोना’ रुग्ण नव्हता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर येथे ‘कोरोना’ने प्रवेश केला आणि तो वाढतच गेला.

सोनगीर व्यापारीपेठेला ‘कोरोना’चा फटका;  ५० कोटींचे नुकसान   

sakal_logo
By
दगाजी देवरे

सोनगीर (ता. धुळे) ः ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर आता लॉकडाउन उठले असले, तरी परिसरातील ३५ ते ४० खेड्यांतील ग्राहकांनी कायमस्वरूपी पाठ फिरवल्याने येथील सर्वच व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, ‘व्यापारीपेठेचे गाव’ या बिरुदावलीला धक्का बसला आहे. व्यावसायिकांना आतापर्यंत ५० कोटींहून अधिकचा आर्थिक फटका बसला असून, बाजारपेठ पूर्ववत ग्राहकांनी कशी फुलेल, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

सोनगीर हे व्यापारीपेठेचे प्रसिद्ध गाव असून, शहरातील सर्व प्रकारचा माल येथे मिळत असल्याने ३५ ते ४० खेड्यांतील लोकांचा येथे दैनंदिन व्यवहार सुरू असतो. २४ मार्च ते ८ जूनदरम्यानच्या लॉकडाउन काळात सर्वच व्यवसाय ठप्प होते. मात्र, तोपर्यंत येथे एकही ‘कोरोना’ रुग्ण नव्हता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर येथे ‘कोरोना’ने प्रवेश केला आणि तो वाढतच गेला. इतका की ‘कोरोना’रुग्णांनी शतकाकडे वाटचाल केली. अनेकजण मरण पावले. परिणामी पुन्हा कधी १४, कधी ७ तर कधी ३ दिवसांचे लॉकडाउन वारंवार झाले. पुढे सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत बाजार सुरू ठेवला.

खेड्यांवरून पायी, सायकल किंवा अन्य वाहनांनी येणाऱ्या ग्राहकांना येथून हिरमुसले होऊन परत जावे लागले. त्यामुळे ग्राहकांनी मोर्चा नरडाणा, शिंदखेडा, धुळे, बेटावद, शिंदखेडा आदी गावांकडे वळवला. येथील उधारी व अन्य खाते बंद होऊन ते अन्यत्र ट्रान्सफर झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. गुरुवारी भरणारा आठवडे बाजार सुरू होऊन दोन महिने झाले. मात्र ग्राहक नाही. त्यामुळे व्यापारीही विक्रीसाठी येत नाहीत. शेकडो शेळीपालक शेतकरी व व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. बोकड घेण्यासाठी शेतात भटकावे लागत आहे. 


एकूण नुकसानाची तपशील 
- आठवडे बाजारातील उलाढाल ः दोन कोटी रुपये 
- सध्याची उलाढाल ः दहा लाख रुपये 
- दैनंदिन बाजारात दररोजची उलाढाल ः २५ ते ३० लाख रुपये 
- सध्याची उलाढाल ः १४ ते १५ लाख रुपये 
- एकूण नुकसान ः ५० ते ६० कोटी 

‘कोरोना’मुळे येथील बाजारपेठ कोसळली आहे. त्यातच कापूस, कांदा अद्याप शेतातच आहे. मूग व अन्य कडधान्य अधिक पावसामुळे वाया गेले. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचाही फटका बाजारपेठेला बसला आहे. 
- प्रमोद धनगर, किराणा व्यापारी, सोनगीर 
 

संपादन- भूषण श्रीखंडे