यंदा पोळा फुटण्यास कोरोनाचा अडसर 

जगन्नाथ पाटील   
Sunday, 16 August 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमाव बंदी व मिरवणूकांना प्रतिबंध आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांना पोळा न फुटताच साजरा करावा लागणार आहे.

कापडणे : धुळे जिल्ह्यात सातत्यपुर्ण पाऊस होत आहे. मका, कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमुग, उडीद, मुग, चवळी आदी पिके जोरकस वाढली आहेत. मुग व उडीद तोडणीही सुरु झाली आहे. यावर्षी पोळ्यावर कोरोनाचे सावट असले तरी पोळा जोरदार साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांनी कंबर कसली आहे. पोळ्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीत वाढ झाली आहे. सर्वसाधारण शेतकर्‍यांनी जुन्या घुंगरमाळांची दुरूस्तीस प्राधान्य देत आहेत. कोरोनामुळे बैलांच्या सवाद्य मिरवणूकीस अडचणीच आहेत.

यंदा पोळा नाही फुटणार
पोळा सण शेतकरी कुटूंबात अमाप आनंद घेवून येत असतो. खरीप हंगाम जोरकस असल्यास, या आनंदाला मोठे उधाण येत असते. यावर्षीही पोळ्याला उत्साहाची किनार आणि आनंदाचे झालर आहे. मात्र कोरोनामुळे सवाद्य मिरवणूकांना बंदी आहे. मिरवणूका काढण्यास परवानगी नाही. गाव दरवाज्याजवळ पोळा फोडण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमाव बंदी व मिरवणूकांना प्रतिबंध आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांना पोळा न फुटताच साजरा करावा लागणार आहे.

बैलजोड्यांची संख्या झाली कमी
जिल्ह्याची आदिवासी जिल्हा म्हणून ओळख आहे. बैल जोड्या,दुभते जनावरे आणि शेळ्या मेंढ्यांची मोठी संख्या असल्याचे ज्ञात आहे. मात्र यांत्रिक शेतीस वेग आल्याने बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. पुर्वी दहा शेतकर्‍यांमागे सहा बैलजोड्या होत्या. आति केवळ दोन तीनवर आल्या आहेत. सामान्य शेतकरी बैलजोडी आजही पाळत आहेत. बर्‍याचश्या मोठ्या शेतकर्‍यांनी बैलजोडीसह दुभते जनावरेही काढून टाकली आहेत.

दरम्यान पोळ्यासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तूंचे भाव दुकानदारांनी लाॅकडाऊनच्या नावाखाली भाव वाढविले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.  

 

संपादन-भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona effect pola festival cannot be celebrated