esakal | ‘कोरोना’मुळे देशात आता ‘स्वदेशी’ची चलती! 
sakal

बोलून बातमी शोधा

swadeshi

देशातील कापसाच्या गाठींची सर्वाधिक खरेदी चीनकडून होते. १७० किलोंची एक गाठी याप्रमाणे चीनला दर वर्षी सरासरी ४० ते ५० लाख गाठींची निर्यात होते. यात एकट्या महाराष्ट्राचा हिस्सा ५० टक्के म्हणजेच सरासरी १५ ते २० लाख गाठींचा असतो.

‘कोरोना’मुळे देशात आता ‘स्वदेशी’ची चलती! 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : देशातील कापसाच्या गाठींची चीनला सर्वाधिक निर्यात होते. यात ५० टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्राचा असतो. कोरोनामुळे तीन महिने लॉकडाउन राहिल्याने कापसाच्या गाठींची निर्यात अवघ्या १० टक्क्यांवर आली आहे. यावर अवलंबून देशातील ट्रेड सेंटर अर्थात मोठ्या महानगरांमधील उलाढाल घटली आहे. त्याचा कापड उद्योगाला मोठा फटका बसला आहे. निर्यातवाढीची सध्या तरी कुठलीही संधी नसल्याने, तसेच देशांतर्गत कापसाच्या गाठी पडून असल्याने वस्त्रोद्योगाला चालना मिळेल. सप्टेंबरनंतर मागणी वाढेल आणि देशात स्वदेशी कपड्यांची अधिक चलती राहील, अशी उद्योजकांना आशा आहे. 

देशातील कापसाच्या गाठींची सर्वाधिक खरेदी चीनकडून होते. १७० किलोंची एक गाठी याप्रमाणे चीनला दर वर्षी सरासरी ४० ते ५० लाख गाठींची निर्यात होते. यात एकट्या महाराष्ट्राचा हिस्सा ५० टक्के म्हणजेच सरासरी १५ ते २० लाख गाठींचा असतो. त्यामुळे निर्यातीतून हजारो कोटींची उलाढाल होते. देशातील कापसाच्या गाठींचा वस्त्रोद्योगासाठी उपयोग होतो. त्यातून चीनने कपड्यांचा व्यापार वाढविला आणि जागतिक बाजारपेठ काबीज केली; परंतु चीनमधून कोरोनाचा जगात फैलाव आणि सीमेवरील वादामुळे देशाचे चीनशी संबंध बिघडले आहेत. शिवाय देशात तीन महिने लॉकडाउनमुळे कापसाच्या गाठींची निर्यात घटली आहे. 

उद्योगांपुढे विविध प्रश्‍न 
ग्राहक घरातच राहिल्याने त्याचा कापड बाजार, उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मुंबई, अहमदाबाद यासारखे ट्रेड सेंटर, बाजारपेठ बंद राहिल्याने ट्रेडर्सने पैसा गुंतविण्याचे टाळले आहे. त्यांच्या बाजारात सरासरी २० ते ३० टक्के घट झाली आहे. कोरोनामुळे ग्राहकांची पहिली गरज कपडे नाही तर खाद्यपदार्थ बनली आहे. या सर्व स्थितीमुळे सूतगिरण्या, जिनिंग व प्रेसिंग उद्योग कसा सुरू करायचा, तो कसा तग धरेल, कमी मनुष्यबळात गिरणी, उद्योग सुरू केला तरी उत्पादन विक्रीला फारसा वाव नसल्याने उद्योजकांनी पैसा कसा मोकळा करावा, असे अनेक प्रश्‍न आहेत. कोरोनासह विविध कारणांमुळे दोन महिने कापसाचे जिनिंग होणार नाही, असे उद्योजक सांगतात. परिणामी, सप्टेंबरनंतर मागणी वाढेल आणि स्थिती सुधारेल, या आशेवर अनेक सूतगिरण्या आहे त्या स्थितीत सुरू झाल्या आहेत. तसेच निर्यातीच्या स्थितीत लवकर फारसा बदल शक्य नसल्याने देशांतर्गत वस्त्रोद्योगातील उत्पादनांची म्हणजेच स्वदेशीची चलती राहील. 

वर्षभराची प्रतीक्षा... 
धुळे जिल्ह्यातील अग्रेसर केशरानंद उद्योगसमूहाचे प्रवर्तक ज्ञानेश्‍वर भामरे, श्री गणेश टेक्स्टाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक विलास देवरे यांनी सांगितले, की सुताची निर्यात घटल्याने देशातील आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. सप्टेंबरनंतर स्थिती सुधारण्याची आशा आहे. कापड उद्योग रुळावर येण्यास किमान वर्ष लागेल. तोपर्यंत देशांतर्गत होणाऱ्या कापडाच्या उत्पादनांचा सर्वाधिक वापर होताना दिसेल.