रुग्णदरात धुळे, जळगाव, नाशिक ‘टॉप टेन’मध्ये 

निखील सुर्यवंशी
Thursday, 20 August 2020

नागरिक आजार अंगावर काढून अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात धाव घेत आहेत. याचा परिणाम रुग्णसंख्या, मृत्युदर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. 

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २० हजार जणांची नमुने चाचणी झाली आहे. यात प्रतिशंभर रुग्णांमागे २५ पॉझिटिव्ह आढळत आहेत. तशीच कमी-अधिक प्रमाणात स्थिती नाशिक, जळगाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे देशातील या रुग्णदरात धुळे, जळगाव, नाशिक टॉप टेनमध्ये आहेत. 

देशात सर्वत्र संसर्गजन्य कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड वाढला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनची प्रक्रिया, अंमलबजावणीत ढिलाई दिसते आहे. त्यात तपासणीचे प्रमाण कमी आहे. काही नागरिक आजार अंगावर काढून अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात धाव घेत आहेत. याचा परिणाम रुग्णसंख्या, मृत्युदर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. 

या पार्श्वभूमीवर मागोवा घेतला असता देशातील टॉप टेन जिल्ह्यात आतापर्यंत तपासणीसाठी घेतलेले नमुने आणि त्यात प्रतिशंभर रुग्णांमागे आढळत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (कंसात टक्केवारी) अशी : रायगड- ४,५७७ (३१.७ टक्के), ठाणे- ३,९०,३७८, रोहतास- १३,४५४ (२७.८), नाशिक- १,०१,६०४ (२६.७), दरभंगा- ७,०७५ (२६), धुळे- २०,४६९ (२५.७), पुणे- ५,६६,५५४ (२३.४), जळगाव- ८३,२६६ (२२), सातारा- ३६०१५ (२१), पाटणा- ८५,१४२ (२०.३). यात नाशिक चौथ्या, धुळे सहाव्या, जळगाव जिल्हा आठव्या स्थानावर आहे. हा दर नियंत्रित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. 

उत्तर महाराष्ट्रात नमुने चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. केवळ रुग्णालये ताब्यात घेऊन, बेड वाढवून उपयोगाचे नाही. नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून विविध नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे, या संदर्भात त्या-त्या यंत्रणेने कठोर, प्रामाणिकतेने कारवाई करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनची प्रक्रिया, अंमलबजावणी प्रामाणिकपणे पार पाडणे, रुग्णच वाढू नयेत म्हणून कसोशीने प्रयत्न करणे, नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास रुग्णसंख्या, मृत्युदर आवाक्यात येऊ शकेल. 
-डॉ. रवी वानखेडकर 
कोशाध्यक्ष, जागतिक वैद्यकीय संघटना 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Corona infected patients are found in Jalgaon, Dhule, Nashik Top Ten in the country