esakal | धुळे जिल्ह्यात खासगी लॅबचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेने वरचढ 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात खासगी लॅबचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेने वरचढ 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांसह बळींची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. रिकव्हरी रेट, डबलिंग रेटमध्येही जिल्ह्याची स्थिती चांगली आहे. आता मृत्युदरही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

धुळे जिल्ह्यात खासगी लॅबचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेने वरचढ 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेतली, तर गेल्या २५ दिवसांत एकूण १४ हजारांवर व्यक्तींचे अहवाल तपासण्यात आले. त्यातील तीन हजार १०५ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. नागरिकांचा खासगी लॅबमध्येही तपासणीचा ओढा वाढला आहे. गेल्या २५ दिवसांत एकूण दोन हजार १६९ जणांनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली. यातील तब्बल एक हजार ७० अर्थात जवळपास निम्म्याच्या आसपास अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, हे विशेष. 

अनलॉकनंतर कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. अनलॉकमुळे साधारण सर्वच व्यवहार आता पूर्वपदावर येत असल्याने अशाही स्थितीत कोरोना संसर्ग कसा रोखता येईल, यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे नमुने तपासणीचा मोठा भार वाढला. त्यात खासगी लॅबची सेवाही सुरू झाल्याने शासकीय व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत झाली आहे. बाधित रुग्णांचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा कलही वाढल्याचे दिसते. परिणामी, खासगी लॅबमध्येही कोविडच्या तपासण्या होत आहेत. २ ते २६ सप्टेंबर या २५ दिवसांच्या तपासणीचा लेखाजोखा पाहिला, तर धुळे शहरासह जिल्ह्यातील तब्बल १४ हजार ३३९ नमुने तपासण्यात आले. यातील तीन हजार १०५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. 

शासकीयमध्ये १२ हजारांवर तपासण्या 
जिल्ह्यात सद्यःस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये (शिरपूर, दोंडाईचा), कोविड केअर सेंटर (महापालिका पॉलिटेक्निक, भाडणे) आदी ठिकाणी नागरिकांचे नमुने घेतले जात आहेत. या सर्व शासकीय रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांत एकूण १२ हजार १७० अहवाल तपासले गेले. यातील दोन हजार ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

खासगी लॅबमधील स्थिती 
२ ते २६ सप्टेंबरदरम्यान खासगी लॅबमध्ये एकूण दोन हजार १६९ अहवाल तपासण्यात आले. यातील तब्बल एक हजार ७० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अर्थात शासकीय रुग्णालये व कोविड सेंटरमधील चाचण्यांची तपासणी व पॉझिटिव्हिटीचा रेट तुलनेने खासगी लॅबमध्ये अधिक असल्याचे दिसून येते. 

आलेख आला खाली 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांसह बळींची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. रिकव्हरी रेट, डबलिंग रेटमध्येही जिल्ह्याची स्थिती चांगली आहे. आता मृत्युदरही कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा आहे. 

२ ते २६ सप्टेंबरदरम्यानची स्थिती 
-एकूण चाचण्या ः १४,३३९ 
-एकूण पॉझिटिव्ह ः ३,१०५ 

-शासकीय रुग्णालये, कोविड सेंटरमधील तपासण्या ः १२,१७० 
-पॉझिटिव्ह ः २,०३५ 

-खासगी लॅबमधील तपासण्या ः २,१६९ 
-पॉझिटिव्ह ः १,०७० 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top