"कोरोना'वरून मेसेज व्हायरल करणाऱ्या माजी महापौरांविरूध्द गुन्हा

विजय शिंदे
सोमवार, 6 एप्रिल 2020

माजी महापौर भगवान करनकाळ (रा. गल्ली क्रमांक सहा, धुळे) यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत रविवारी (ता. 5) दुपारी पाचच्या सुमारास दोन विभिन्न गटांत तेढ निर्माण होईल या उद्देशाने एक पोस्ट फेसबुकवर व्हायरल केली.

धुळे : दिल्लीतील हजरत निजामुद्दीनमधील घटनेनंतर संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ने वेगळे वळण घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर जातीय तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मेसेज फेसबुकवर व्हायरल केल्याने पोलिसांनी शिवसेनेचे माजी महापौर भगवान करनकाळ यांच्याविरुद्ध आज आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
"कोरोना'चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी "लॉक डाऊन'सह संचारबंदी लागू आहे. असे असताना सोशल मीडियावर "कोरोना'संदर्भात आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. माजी महापौर भगवान करनकाळ (रा. गल्ली क्रमांक सहा, धुळे) यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत रविवारी (ता. 5) दुपारी पाचच्या सुमारास दोन विभिन्न गटांत तेढ निर्माण होईल या उद्देशाने एक पोस्ट फेसबुकवर व्हायरल केली. ती "मास्क'वरून होती. तसेच वादग्रस्त स्वरूपाचे चित्रही त्यांनी फेसबुक पोस्ट केले. पोलिसांनी "सायबर सेल'द्वारे हा आक्षेपार्ह मेसेज पसरविणाऱ्याचा शोध घेतला. त्यानुसार आझादनगर पोलिस ठाण्यात माजी महापौर भगवान करनकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा ठरला आहे.

दुसरा गुन्हा दाखल
"कोरोना'संदर्भात व्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी पंचवटी परिसरातील दर्शन पारस निकम या तरुणाविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक लोकेश नरेंद्र पवार यांनी फिर्याद दिली. पवारने शनिवारी (ता. 4) सकाळी अकरा ते दुपारी दीडच्या दरम्यान व्हॉट्‌सऍपवर पाच मेसेज आणि फोटोव्दारे तेढ व द्वेष निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे गुन्हा दाखल झाला. निरीक्षक संजय सानप तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona massage social media viral ex mayer fir