धक्कादायक : धुळे जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त; साक्रीतील एकाचा मृत्यू

निखिल सूर्यवंशी
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

आतापर्यंत धुळे जिल्हा सुरक्षित होता. चौफेर सीमेलगतच्या जळगाव, नाशिक, मालेगाव, शिरपूर सीमेलगत सेंधव्यापर्यंत आणि साक्री- नवापूर सीमेलगतच्या सुरतपर्यंत "कोरोना'ने पाय पसरले. त्यामुळे धुळे जिल्ह्याची झोप उडाली.

धुळे : धुळे जिल्ह्यात आज दोन "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पैकी एका 60 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला असून 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आता सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी लागणार आहे. मालेगाव आणि साक्री परिसरातील दोघे कोरोनाग्रस्त आढळल्यावर वैद्यकीय यंत्रणा गर्भगळीत झाली आहे.

पोलिसांनी दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचा निवास परिसर "सील' करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
राज्यात ठिकठिकाणी संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ची लागण झाल्यानंतर आतापर्यंत धुळे जिल्हा सुरक्षित होता. चौफेर सीमेलगतच्या जळगाव, नाशिक, मालेगाव, शिरपूर सीमेलगत सेंधव्यापर्यंत आणि साक्री- नवापूर सीमेलगतच्या सुरतपर्यंत "कोरोना'ने पाय पसरले. त्यामुळे धुळे जिल्ह्याची झोप उडाली.
या पार्श्‍वभूमीवर सरकारी यंत्रणेने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारापासून रविवारी पहाटे पाचपर्यंत आरोग्य सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी, "लॉक डाऊन'चा आदेश बजावला आहे. अशात शुक्रवारी साडेसहापर्यंत सरकारी यंत्रणा आणि हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालय दैनंदिन कामकाजात गुंतलेले असताना दोन "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्याची माहिती पुढे येताच वैद्यकीय व सरकारी यंत्रणा गर्भगळीत झाली. साक्री येथील 60 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे, तर मालेगाव येथील 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू आहे. साक्री येथील कामगार प्रौढ गुरुवारी (ता. 9) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर तो तपासणी अहवालाव्दारे कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. संबंधित तरुणी मालेगाव येथून धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona positive case one death sakri