"कोरोना'ने गिळले चार लाखांतून हजारो लिटर रसायन अन्‌ पाणीही! 

रमाकांत घोडराज
Wednesday, 27 May 2020

महापालिकेने शहरात मार्चमध्येच ही फवारणी सुरू केली होती. 20 एप्रिलला धुळ्यात "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळला आणि या प्रक्रियेला आणखी वेग आला. 

 धुळे ः सॅनिटायझर, सॅनिटायझेशन हे सर्वसामान्यांच्या शब्दकोशात नसलेले शब्द "कोरोना'मुळे सध्या सर्वांच्याच तोंडपाठ झाले आहेत. "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळला, की महापालिकेची यंत्रणा संबंधित भागात सॅनिटायझेशनसाठी पोहोचते. मार्च- एप्रिलपासून शहरात सॅनिटायझेशनचे हे चित्र धुळेकरांना पाहायला मिळत आहे. या सॅनिटायझेशनसाठी महापालिकेकडून आतापर्यंत तब्बल पाच हजार 263 लिटर "सोडिअम हायपोक्‍लोराईट' रसायनाचा वापर झाला. खर्चाच्या अंगाने विचार केला तर तब्बल चार लाख 21 हजार रुपये निव्वळ या रसायनावरच खर्च झाला आहे. पाण्याचा विचार केला तर या रसायनाच्या फवारणीसाठी तब्बल साडेआठ लाख लिटर पाणी वापरले गेले. 

धुळे शहरात "कोरोना'चा शिरकाव होण्यापूर्वीच महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या होत्या. यात ठळकपणे नजरेस पडणारी उपाययोजना म्हणजे जंतुनाशकाची फवारणी. महापालिकेने शहरात मार्चमध्येच ही फवारणी सुरू केली होती. 20 एप्रिलला धुळ्यात "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळला आणि या प्रक्रियेला आणखी वेग आला. 

पाच हजार लिटरचा वापर 
ठिकठिकाणी सॅनिटायझेशन अथवा जंतुनाशकांच्या फवारणीसाठी महापालिकेकडून सोडिअम हायपोक्‍लोराईट या रसायनाचा वापर होत आहे. महापालिकेने सहा हजार लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईटची खरेदी केली आहे. "कोरोना' संसर्गाचा धोका सुरू झाल्यानंतर त्यातही शहरात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्यानंतर साधारण दीड-दोन महिन्यांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आजअखेर पाच हजार 263 लिटर सोडिअम हायपोक्‍लाराईटचा वापर झाला आहे. 
 

चार लाखांवर खर्च 
महापालिकेने साधारण 80 रुपये प्रतिलिटर दराने चार लाख 80 हजार रुपये खर्च करून सहा हजार लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईट खरेदी केले. यापैकी आजअखेर चार लाख 21 हजार रुपयांचे रसायन वापरले गेले. कोरोनाचा धोका कायम असल्याने यावर यापुढेही खर्च होणार आहे. 

असा वापर, अशी यंत्रणा 
धुळ्यात हजार लिटर पाण्यात सहा लिटर सोडिअम हायपोक्‍लोराईट (सर्वसामान्य भागात), हजार लिटर पाण्यात दहा लिटर सोडियम हायपोक्‍लोराईट (पॉझिटिव्ह रुग्णाच्या भागात), फवारणीसाठी पाच वाहनांचा वापर, हातपंपाद्वारे फवारणीसाठी 20 कर्मचारी, सॅनिटायझेशनसाठी एकूण 30 कर्मचारी, 
फवारणीसाठी सोडियम हायपोक्‍लोराईट व पाण्याचे प्रमाण याचा हिशेब केला तर पाच हजार 263 लिटर रसायनाचा वापर झाल्याने एक हजार लिटर पाण्यात सहा लिटर रसायन, असे प्रमाण गृहीत धरले तर तब्बल आठ लाख 77 हजार 166 लिटर पाण्याचा यासाठी वापर झाल्याचे दिसते. अर्थात, रसायन व पाण्याचे प्रमाण ठिकठिकाणी कमी-जास्त आहे. त्यामुळे पाणी वापराची ही आकडेवारी थोडी कमी होऊ शकते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Corona swallowed thousands of liters of chemicals and water out of four lakhs!