esakal | रिकव्‍हरी रेटचे ठिक पण मृत्‍यूदर वाढतोय त्‍याचे काय..
sakal

बोलून बातमी शोधा

death

मृत्यूदर एक टक्केपेक्षा कमी करण्याबाबत केंद्र शासनाच्या राज्याला सूचना आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबळींची संख्या घटल्याचे दिसते. त्यामुळे हा मृत्यूदर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

रिकव्‍हरी रेटचे ठिक पण मृत्‍यूदर वाढतोय त्‍याचे काय..

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोविड-१९ रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी अर्थात डबलिंग रेट व रिकव्हरी रेट मध्ये राज्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत धुळे जिल्ह्याची स्थिती चांगली आहे, मृत्यूदर देखील तुलनेने कमी असला तरी तो किंचित वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य सेवा संचालनालयाने नोंदविले आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला प्रयत्न करावे लागणार आहेत. मृत्यूदर एक टक्केपेक्षा कमी करण्याबाबत केंद्र शासनाच्या राज्याला सूचना आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबळींची संख्या घटल्याचे दिसते. त्यामुळे हा मृत्यूदर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने १७ सप्टेंबरला राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदांसह आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात कोविड-१९ रुग्णांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट, डेथ रेट बाबत स्थिती मांडून आवश्‍यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

डबलिंग रेटमध्ये धुळ्याची स्थिती 
डबलिंग रेटमुळे कोविड-१९ रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा लागणारा कालावधी समजण्यासाठी उपयोग होतो. सध्या राज्याचा हा डबलिंग रेट ३१.१२ दिवस आहे. राज्याच्या या डबलिंग रेटपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, औरंगाबाद, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये हा रेट कमी अथवा कमी होत असल्याने तो वाढविण्याच्या सूचना आहेत. 

रिकव्हरी रेटही जास्त 
सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ६९.८० तर देशाचा ७८.०० टक्के आहे. पालघर, धुळे, ठाणे, मुंबई, गडचिरोली, नगर, नाशिक, औरंगाबाद, हिंगोली, वाशिम, रायगड, जळगाव, सोलापूर या जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट जास्त आहे. अन्य जिल्ह्यांचा कमी आहे. रिकव्हरी रेटमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. 

डेथ ऑडिटच्याही सूचना 
राज्यातील मुंबई, सोलापूर, अकोला, परभणी, सांगली, रत्नागिरी, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांचे कोविड-१९ रुग्णांचा मृत्यूदर (सीएफआर) राज्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. परभणी, बीड, नागपूर, धुळे, सातारा, पालघर, वाशिम, सिंधुदुर्ग, नगर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा सीएफआर वाढत असल्याचे निदर्शनास येते. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सेवा, विशेषज्ञांचे कौशल्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचाराबाबत मार्गदर्शन या बाबी पाहता मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण यात कोविड-१९ मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा आणि महापालिका स्तरावरील डेथ ऑडिट कमिटीमार्फत दर आठवड्याला डेथ ऑडिट करण्याचेही निर्देश दिले आहेत. 

जिल्हानिहाय मृत्यूदर 
जिल्हा...३० ऑगस्ट...०६ सप्टेंबर...१३ सप्टेंबर 
-धुळे...२.७३...२.४१...२.५८ 
-जळगाव...३.१६...२.९४...२.७६ 
-नंदुरबार...२.७९...२.५६...२.४८ 
-राज्याचा एकूण...३.१३...२.९३...२.७९ 

जिल्हानिहाय डबलिंग रेट 
जिल्हा...३० ऑगस्ट...०६ सप्टेंबर...१३ सप्टेंबर 
-धुळे...२६.५७...२२.२६...३८.०८ 
-जळगाव...२४.७३...३०.१४...२९.६३ 
-नंदुरबार...११.२४...२२.६१...२४.८१ 
-एकूण...३६.०५...३२.३०...३१.१२ 

जिल्हानिहाय रिकव्हरी रेट ः 
जिल्हा...३० ऑगस्ट...०६ सप्टेंबर...१३ सप्टेंबर 
-धुळे...६९.१३...७१.१९...७८.७० 
-जळगाव...६९.१३...७१.३१...७०.५२ 
-नंदुरबार...४८.९६...५७.६३...६६.९६ 
-राज्याचा एकूण...७२.०४...७१.०३...६९.८० 

संपादन ः राजेश सोनवणे