धक्कादायक : धुळे जिल्ह्यात पाच पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या 8 वर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

पॉझिटिव्ह पाच रुग्णांमध्ये एका बाधिताच्या संपर्कातील चार आणि शिंदखेडा तालुक्‍यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यातही पाच जणांमध्ये एक महिला आहे. 

धुळे : जिल्ह्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्ण संख्या तीन होती. मात्र, सायंकाळी नव्याने पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हा सरकारी यंत्रणा पुरती हादरली आहे. पॉझिटिव्ह पाच रुग्णांमध्ये एका बाधिताच्या संपर्कातील चार आणि शिंदखेडा तालुक्‍यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यातही पाच जणांमध्ये एक महिला आहे. 
जळगाव, नंदुरबारपेक्षा धुळे जिल्ह्यात संसर्गजन्य कोरोना व्हायरसची लागण झालेले अधिक रुग्ण वाढल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दुपारपर्यंत जिल्ह्यात तिसरा आणि धुळे शहरात दुसरा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने यंत्रणा हादरली. तीन पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. 
जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण साक्री शहरात आढळला. त्याचा मृत्यू झाला. या शहरात संसर्गजन्य आजार पोहोचला कसा ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन आठवड्यानंतर धुळे शहरात सोमवारी (ता. 21) तिरंगा चौक परिसरात एका प्रतिष्ठिताच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मालेगावला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तेथे तीन वेळा "तो' गेला होता, अशी माहिती समोर येत आहे. संपर्कातील "त्या' प्रतिष्ठीतासह 91 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील सरासरी 20 ते 45 वर्षे वयोगटातील चार नातेवाईक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रात्री साडेआठला प्राप्त झाला. याशिवाय शिंदखेडा तालुक्‍यातील 70 वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्हमध्ये समावेश आहे. 
धुळे शहरातील दाट वस्तीच्या भागातील 57 वर्षीय पॉवरलूम व्यावसायिक व शेतकऱ्याचा आज (मंगळवार) पहाटे मृत्यू झाला. नंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वैद्यकीय यंत्रणेला दुपारी प्राप्त झाला. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव, महापालिका आयुक्त अजीज शेख, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शासनाच्या निर्देशानुसार धुळे शहरातील कोरोना बाधित सरासरी एकूण दहा किलोमीटरपर्यंतच्या परिघातील क्षेत्र "सील' केले आहे. तेथे चौदा दिवस संचारबंदी राहील. या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार गरजेच्या वस्तू, आरोग्य सेवा महापालिकेतर्फे पुरविल्या जातील. बाधित रुग्णांचा संपर्क आलेले तीन दवाखाने महापालिकेने दक्षतेसाठी "सील' केले आहेत. धुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची रुग्ण संख्या 8 वर गेल्याने दक्षतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे शहरात दोन दिवस संपूर्ण "लॉक डाऊन'चा आदेश लागू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona virus five positive report today