"कोरोना"च्या भीतीमुळे "त्या'च्याजवळ ना पत्नी गेली, ना डॉक्‍टर..!

निखिल सूर्यवंशी
बुधवार, 18 मार्च 2020

कुणीच रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हता की त्या व्यक्तीजवळ जाऊन उपचार देण्यास तयार नव्हता. अक्षरशः औषधे, गोळ्या लांबूनच त्या व्यक्तीच्या दिशेने भिरकावल्या जात होत्या. जेवणाचे ताटही ढकलून दिले जात होते.

धुळे : केवळ "कोरोना'चा संशय व्यक्त झाल्यानंतर "त्या'च्याजवळ ना पत्नी, ना डॉक्‍टर, ना कर्मचारी कुणीही जायला तयार नव्हते... एवढेच नव्हे, तर रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडायलाही कुणी तयार होईना... येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातही त्याला अशाच वागणुकीचा अनुभव आला... एवढेच काय, लांबूनच त्याच्या दिशेने गोळ्या फेकल्या गेल्या...जेवणाचे ताट ढकलले गेले...... तपासणीचा "रिपोर्ट नॉर्मल' आल्यावर मात्र कुटुंबासह शासकीय यंत्रणेने त्याला "जवळ' केले... हा विरोधाभासाचा प्रकार पाहिल्यास "करोना'बाबतची तयारी म्हणजे नुसताच देखावा असल्याची प्रचिती आली.
अमळनेर (जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी व डेन्मार्कमध्ये नोकरीस असलेला एकजण काही दिवसांपूर्वी अमळनेर येथे आला. नंतर तो चार ते पाच दिवस नातेवाइकांची भेट घेत फिरला. त्याची पत्नी सामोडे परिसरात (ता. साक्री, जि. धुळे) माहेरी मुक्कामी होती. तिला घेण्यासाठी तो म्हणजेच तिचा पती आला. त्या दिवशी त्याला सर्दी, खोकला झाल्याने बरे वाटत नव्हते. ही बाब गावातील काही जणांना कळाली. इथेच माशी शिंकली अन्‌ त्यांनी विदेशातून आलेल्या व्यक्तीविषयीची माहिती जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला दिली.
प्रशासनाने त्या व्यक्तीला घेण्यासाठी खास रुग्णवाहिका पाठविली. तेथे रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्यापासून ते बंद करण्यासही कुणी तयार होत नव्हते. त्याची पत्नीही जवळ येण्यास घाबरत होती. मग त्यानेच कसाबसा मार्ग काढत रुग्णवाहिका गाठली आणि त्याला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. तेथेही कुणीच रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हता की त्या व्यक्तीजवळ जाऊन उपचार देण्यास तयार नव्हता. अक्षरशः औषधे, गोळ्या लांबूनच त्या व्यक्तीच्या दिशेने भिरकावल्या जात होत्या. जेवणाचे ताटही ढकलून दिले जात होते. नंतर काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर त्या व्यक्तीत "कोरोना'ची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. तेव्हा त्याच्यासह कुटुंबीय व शासकीय यंत्रणेच्या जिवात जीव आला. पण त्या काही तासांमध्ये मिळालेल्या वागणुकीमुळे ती व्यक्ती अस्वस्थ आणि नाराज झाली. डेन्मार्कच काय विदेशात कुठेही अशी वागणूक दिली गेली नसती, अशी भावना त्याने व्यक्त केली. त्याने घडलेला हा प्रकार एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितला.

यंत्रणा काय बोध घेणार?
"कोरोना'चा संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाची नियुक्ती करावी लागेल. वैद्यकीय पथकाकडे विशिष्ट स्वरूपाचे "ड्रेस' असावेत. ते तातडीने उपलब्ध केले जावेत. तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे पथकही नियुक्त केले जावे. त्यांनाही विशिष्ट "ड्रेस' पुरविले जावेत. प्रशिक्षित वैद्यकीय व कर्मचाऱ्यांचे पथक जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालये, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांत असतील तरच ते संशयित रुग्णांना उपचार पुरवू शकतील. अन्यथा, तयारी, नियोजन केवळ कागदावर दिसेल. यात अमळनेर ते साक्री तालुका प्रवासातील त्या व्यक्तीबाबत घडलेल्या प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने, आरोग्य यंत्रणेने योग्य तो बोध घेऊन उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona virus man wife and docter long distance