esakal | आर्थिक संकटामुळे घरोघरी दूध विक्रीचा पर्याय 
sakal

बोलून बातमी शोधा

milk

"कोरोना'मुळे दूध खरेदी करणारा मोठा वर्ग संचारबंदीमुळे घरात कोंडला गेल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे डेअरीचालक शेतकरी वा पूरक उत्पादकांकडून कमी प्रमाणात दूध स्वीकारत आहेत.

आर्थिक संकटामुळे घरोघरी दूध विक्रीचा पर्याय 

sakal_logo
By
विलास पाटील

धुळे : "कोरोना'मुळे राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याने हॉटेल व चहाची दुकाने बंद झाली आहेत. जिल्ह्यातून बाहेरगावी जाणारे दूधही बंद झाले आहे. या स्थितीत दुधाचा पुरवठा व मागणी घटल्याने संबंधित शेतकरी, व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. उदरनिर्वाहासाठी दूध उत्पादक गावात किंवा शहरात घरोघरी दूध विक्री करत आहेत. 
"कोरोना'मुळे दूध खरेदी करणारा मोठा वर्ग संचारबंदीमुळे घरात कोंडला गेल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे डेअरीचालक शेतकरी वा पूरक उत्पादकांकडून कमी प्रमाणात दूध स्वीकारत आहेत. उत्पादक उर्वरित दूध घरी किंवा गावात विक्री करीत आहे. शहरातील मोठ्या दूध संकलन केंद्रांवर खवा, दही, पेढे, पनीर, बासुंदी आदी दुग्धजन्य खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी दूध खरेदी केले जाते. किरकोळ स्वरूपात ग्राहकांना विक्री केली जाते. 

"एचपी' दुधाची मागणी घटली 
जिल्ह्यातील काही डेअरी व हॉटेलचालक दुधातील साय काढल्यानंतर दूध विक्री करतात. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेलमध्ये पनीर तयार करण्यासाठी या "एचपी' दुधाची मोठी मागणी असते. हॉटेल बंद असल्याने "एचपी' दूध बाहेर पाठविणे बंद झाले आहे. या दुधाला मागणी घटल्याने स्वतः:च पनीर तयार करत आहेत. 

भावावर परिणाम नाही 
ग्राहकांना गायीचे दूध 42, तर म्हशीचे दूध 52 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जाते. ग्राहक सकाळी व सायंकाळी दूध संकलन केंद्रांवरून दूध खरेदी करतात. काही दूध उत्पादक नेहमीप्रमाणे थेट ग्राहकांच्या दारी जाऊन विक्री करीत आहेत. संकलन केंद्रांवर जास्त दूध खरेदी होत नसले, तरी कमी प्रमाणात दूध उरत असल्याने दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. संचारबंदीमुळे ग्राहक कॉलनी परिसरातच दूध खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. आम्ही फक्‍त दही, तूप व बासुंदी तयार करण्यासाठी दूध खरेदी करतो. दुधाची किरकोळ विक्री कमी प्रमाणात होते, असे माणिक दुग्धालयाचे मालक शरद गवळी यांनी सांगितले.  
 

loading image