जनहो, "आत्मनिर्भरता' समजून घ्या : मानसशास्त्र तज्ज्ञ प्रा. वैशाली पाटील

निखिल सूर्यवंशी
Saturday, 16 May 2020

कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू मांडत नसून पंतप्रधानांच्या "आत्मनिर्भर व्हा' अशा संदेशाचा अर्थ नेमकेपणाने समजून घेतला जावा, यासाठी प्रयत्नशील आहे. या संदेशाचा सोशल मीडियावर अनेकांकडून विपर्यास केला जात आहे.

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'शी मुकाबला करताना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देशवासीयांना दिला आहे. त्यावरून सोशल मीडियावर नाही नाही ते जोक- टिका व्हायरल होत आहे. त्याची खंत वाटते. खर तर "कोरोना'विरुद्धची लढाई आता वैयक्तिक पातळीवर व्हायला हवी. यात "मला हे जमणार नाही, माझ्या प्रतिष्ठेला, "डिग्री'ला शोभणार नाही', अशा नकारात्मक विचारांना मूठमाती देऊन माझी वाट शून्यातून निर्माण करेल, असा आत्मविश्‍वासपर विचार स्वीकारणे व तो कृतीत आणणे म्हणजे आत्मनिर्भर होणे हा अर्थ समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा मानसशास्त्र तज्ज्ञ, समुपदेशक प्रा. वैशाली पाटील यांनी व्यक्त केली.
प्रा. वैशाली पाटील म्हणाल्या, की मी कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू मांडत नसून पंतप्रधानांच्या "आत्मनिर्भर व्हा' अशा संदेशाचा अर्थ नेमकेपणाने समजून घेतला जावा, यासाठी प्रयत्नशील आहे. या संदेशाचा सोशल मीडियावर अनेकांकडून विपर्यास केला जात आहे. त्यामुळे विचार भरकटू शकतात. तसे घडू नये. "कोरोना'च्या महामारीत पॅकेज जाहीर केल्याने सरकारकडे वीस लाख कोटी रुपये आहेत, असे अनेक जणांना वाटू लागल्याने रोजगाराच्या नावाने आता पैसे मिळवता येईल, अशी आस ते बाळगून असावेत. बऱ्याचदा अशा स्वरुपाच्या अनेक भ्रामक कल्पनाविलासात देश पुढे आहे..

खारीचा वाटा उचलावा
"कोरोना' महामारीशी सामना करताना "आत्मनिर्भर व्हा' म्हणजे पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचे आहे, लाथ मारेल तिथं पाणी काढेल इतका आत्मविश्वास आता प्रत्येकाने जागवायचा आहे, असे सांगत प्रा. पाटील यांनी सोळाव्या वर्षांनंतर प्रत्येकाने जमेल ते काम करण अपेक्षित आहे. "असेल हरी तर देईल खाटल्यावरी' या निरर्थक भ्रामक कल्पनेतून "त्यांना' बाहेर पडावे लागेल. आळस, उदासीनता झटकून जोमाने कामाला लागावे लागेल. पंधरा ते सोळा तास काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. प्रत्येकाने हातात येईल ते काम करणे, कुठे तरी जातिभेद व राज्य- प्रांत वाद, मतभेद विसरून फक्त भारतीय म्हणून देशाच्या सक्षमतेसाठी खारीचा वाटा उचलणे अपेक्षित असल्याची जाणीव करून दिली.

हिटलरचा विचार अन्‌...
त्या म्हणाल्या, की महामारीत अनेक व्यक्ती "डिप्रेशन'मध्ये आहेत. त्यांना दिशा दिसत नाही. त्याचे कारण लोकांची विचार करण्याची पद्धत. हुकुमशहा अडॉल्फ हिटलरने सांगून ठेवले आहे, की संयमी विचारबुद्धीऐवजी लोकांवर राज्य करते ती भावनाशीलता. त्याचा अर्थ असा की लोक भावनेने चालतात. हिटलरचे हे सर्वसामान्यांविषयीचे मत होते. सर्वसामान्य लोकांच्या मनातील भावनाही फार गुंतागुंतीच्या नसतात. ते केवळ प्रेम आणि द्वेष, चांगले आणि वाईट, खरे आणि खोटे, अशा "बायनरी'मध्येच विचार करू शकतात. थोडे हेही असेल, थोडे तेही असेल, असा विचारच त्यांच्याकडे नसतो, असे हिटलर म्हणत. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी जर्मनांची क्रूर, अशी प्रतिमा उभी केली. तो प्रोपगंडा यशस्वी का ठरला? तर हिटलरने सांगितले होते, की लोकांच्या भावना या नेहमीच टोकाच्या असतात. त्यामुळे जर्मन अत्याचाराच्या कथांवर त्यांचा विश्वास बसला. मला वाटते अशा स्वरूपाचा विचार "कोरोना'च्या लढाईत लोक करत असावे. त्यामुळे आपणच स्व- चा शोध घेतला पाहिजे. आपल्या क्षमता ओळखून विकसित केल्या पाहिजे. न थांबता आत्मनिर्भरतेवर असंख्य वाटा तुडविल्या पाहिजे. तसे झाल्यास यश, आर्थिक समृद्धता नांदू शकेल, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

नूडल्स पोहोचतात...पुरणपोळी का नाही?
माझ्या शिक्षणाप्रमाणे कमी प्रतीचे काम मी करणार नाही, असा जळमट विचार काढून सकारात्मकतेने वाट्टेल ते काम करण्याची तयारी ठेवायला पाहिजे. स्वदेशी मालाचा वापर वाढला पाहिजे. नवनव्या उद्योग- व्यवसायांच्या वाटा स्त्री- पुरुषाने निर्माण केल्या पाहिजे. चायनीज नूडल्स खेडेगावापर्यंत पोहचू शकतात, तर मग आमची खापराची पुरणपोळी, बटाटावडा आदी रूचकर पदार्थ परदेशातील प्रत्येक कोपऱ्यात का जाऊ शकत नाही, असाही विचार महिलांनी, उदयोन्मुख व्यावसायिकांनी करावा, अशी अपेक्षा प्रा. वैशाली पाटील यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona virus Self reliance vaishali patil