esakal | "कोरोना'बाबत वैद्यकीय तपासणीचे निकष शिथिल करावे : डॉ. वानखेडकर
sakal

बोलून बातमी शोधा

dr ravi wankhedkar

वैद्यकीय तपासणीतील सद्यःस्थितीमुळे सरकारी यंत्रणेची केवळ दहा टक्के क्षमता वापरली जात आहे. अधिकाधिक तपासणी झाली, तर स्थिती हाताबाहेर जाईल, कार्यभार (बर्डन) वाढेल, असे सरकारला वाटते.

"कोरोना'बाबत वैद्यकीय तपासणीचे निकष शिथिल करावे : डॉ. वानखेडकर

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : "कोरोना व्हायरस' थैमान घालत असताना भारतात परदेशातून विविध राज्यात येणारे, त्यांच्या संपर्कात आलेले किंवा "पॉझिटिव्ह' रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीच वैद्यकीय तपासणी केली जाते. अन्य, व्यक्ती तपासणीस गेला तर त्याचे नमुने घेत नाहीत. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वात ते बसत नसल्याचे कारण पुढे केले जाते. ही गंभीर स्थिती पाहता वैद्यकीय तपासणीच्या निकषांमध्ये शिथिलता यावी, असे जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोशाध्यक्ष, "आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले.

वैद्यकीय तपासणीतील सद्यःस्थितीमुळे सरकारी यंत्रणेची केवळ दहा टक्के क्षमता वापरली जात आहे. अधिकाधिक तपासणी झाली, तर स्थिती हाताबाहेर जाईल, कार्यभार (बर्डन) वाढेल, असे सरकारला वाटते. मात्र, आग किती व कुठे पसरली हे डोळ्यावर पट्टी बांधून समजणार नाही आणि संकटाशी मुकाबला करता येणार नाही, असेही डॉ. वानखेडकर म्हणाले.

आजार कळेल कसा?
त्यांनी सांगितले, की "कोरोना'शी मुकाबला करताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांशिवाय हाती दुसरे काहीच नाही. "कोरोना'ची "चेन ब्रेक' करावी लागेल. त्यासाठी वैद्यकीय तपासणी, विलगीकरण, उपचार ही त्रिसूत्री अमलात आणावी लागेल. तपासणी केल्याशिवाय आजार कळेल कसा? तपासणीबाबत निकषांत इटली, सुरवातीच्या अमेरिकेप्रमाणे भारत देशही चुकतो आहे. सिंगापूर, तैवान, कोरिया आणि आता अमेरिकेने अधिकाधिक तपासणीवर भर दिला आहे. महाराष्ट्रात "कोरोना'ची 5 वरून रुग्णसंख्या 50 वर, नंतर 66 वर गेली. ही संख्या केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने संथ गतीने वाढली. आयुष्यमान भारत ही योजनाही "कोरोना'शी लढा देण्यास पुरेशी ठरणार नाही.
आपल्याला काहीच होणार नाही, या अहंभावनेत, भ्रमात कुणी राहू नये. या आजाराचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि प्रत्येकाने काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारकडून होणाऱ्या प्रयत्नांना एकदिलाने साथ द्यावी, असे सांगत डॉ. वानखेडकर यांनी संसर्गजन्य "कोरोना व्हायरस' वेगात पसरत असून त्याचा जगातील एकूण रुग्णसंख्येपैकी मृत्यू दर 3.4 टक्के, तोच दर इटलीचा 6.3, तर चीनचा 2.4 टक्के आहे, या आजारावर प्रतिबंधात्मक लस आणि उपचार नसल्याने तो "डेंजरस' ठरत असल्याचे सांगितले. अमेरिकेमध्ये आता 20 ते 45 वर्षे वयोगटाच्या तरुणांना लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे राज्याने बोध घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात उद्या (ता. 22) जनता संचारबंदीचे आवाहन करत "कोरोना'शी मुकाबल्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. वानखेडकर यांनी केले.

loading image