esakal | सावधान.. गर्दीत फिरताहेत कोरोना पॉझिटिव्ह; रॅपिड ॲन्टिजेन टेस्‍टमधील चित्र 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus rapid test

महापालिकेने १३ नोव्हेंबरपासून शहरातील महात्मा गांधी पुतळा, देवपूर दत्त मंदिर चौक, बारापत्थर, शहर पोलीस चौकी व संतोषी माता चौक अशा पाच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केले आहेत. या पाच ठिकाणी गेल्या तीन दिवसात एकूण ५८५ नागरिकांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या.

सावधान.. गर्दीत फिरताहेत कोरोना पॉझिटिव्ह; रॅपिड ॲन्टिजेन टेस्‍टमधील चित्र 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : गर्दीमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीचा शिरकाव होऊन संसर्गाचा उद्रेक होऊ नये यासाठी महापालिकेने शहरात पाच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रावर गेल्या तीन साडेपाचशेवर नागरिकांचे नमुने घेऊन चाचणी करण्यात आली. त्यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्हची संख्या पाहता दिलासादायक चित्रही म्हणता येईल. पण यात मोठा धोकाही दडलेला असल्याचे नाकारून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. 

सध्या वातावरण बदलल्याने व थंडीच्या दिवसात पुन्हा कोरोना विषाणू संसर्ग बळावण्याचा, दुसरी लाट येण्याचा धोका कायम आहे. त्यासाठी शासन, प्रशासनाकडून नागरिकांना मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी विविध उपाययोजना करून कोरोनाला दूर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे असले तरी बाजारात गर्दी उसळत आहे. या गर्दीत कोरोनाबाधितांचा शिरकाव धोक्याला निमंत्रण देणारा आहे. त्यामुळे अशा बाधितांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याच्या अनुषंगाने महापालिकेने शहरात पाच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केले आहेत. मास्क न लावणाऱयांसह इतरांची या केंद्रात चाचणी होते. 

साडेपाचशेवर तपासण्या 
महापालिकेने १३ नोव्हेंबरपासून शहरातील महात्मा गांधी पुतळा, देवपूर दत्त मंदिर चौक, बारापत्थर, शहर पोलीस चौकी व संतोषी माता चौक अशा पाच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केले आहेत. या पाच ठिकाणी गेल्या तीन दिवसात एकूण ५८५ नागरिकांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यातील केवळ तीन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या तीनपैकी एकजण महात्मा गांधी पुतळ्याजवळील केंद्रात तर इतर दोघे संतोषी माता चौकातील केंद्रातील चाचणीत पॉझिटिव्ह आले. 

दिलासा अन्‌ धोकाही 
गर्दीच्या ठिकाणी सुरू केलेल्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रांमध्ये तपासणी केलेल्या एकूण ५८५ नागरिकांपैकी केवळ तीन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आकड्यांचा हा खेळ पाहता वरवर केवळ तीनचा आकडा दिलासादायक वाटत असला तरी दुसऱ्या बाजूने विचार केला तर गेल्या तीन दिवसात बाजार उसळलेल्या गर्दीत नकळतपणे कोरोना पॉझिटिव्ह फिरत असल्याचेही दिसते. त्यामुळे ही स्थिती धोकादायक, उद्रेक निर्माण करणारीही आहे असेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे गरेजेचे आहे. 
 
रॅपिड टेस्टची स्थिती अशी 

दिवस...चाचण्या...पॉझिटिव्ह 
१३ नोव्हेंबर...२१७...०१ 
१४ नोव्हेंबर...१५३...०० 
१५ नोव्हेंबर...२१५...०२