esakal | दिलासा..धुळ्यात आठवडाभरापासून कोरोनाचा बळी नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

कोरोना विषाणू संसर्गाने एप्रिलमध्ये धुळे जिल्ह्यात शिरकाव केला होता. त्यानंतर जगभरात थैमान घालणाऱ्या या कोरोना विषाणूमुळे धुळे जिल्हावासीयही हैराण झाले आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७४ बळी गेले आहेत.

दिलासा..धुळ्यात आठवडाभरापासून कोरोनाचा बळी नाही 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : गेल्या साडेसहा-सात महिन्यांपासून थैमान घालून आत्तापर्यंत जिल्ह्याभरातील तब्बल ३७४ नागरिकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून कोरोनामुळे बळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे. त्यामुळे जिल्हावासियांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे. कोरोनामुळे आजही (ता. ३०) कुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही. बाधितांमध्ये मात्र १७ रूग्णांनी भर पडली. 
कोरोना विषाणू संसर्गाने एप्रिलमध्ये धुळे जिल्ह्यात शिरकाव केला होता. त्यानंतर जगभरात थैमान घालणाऱ्या या कोरोना विषाणूमुळे धुळे जिल्हावासीयही हैराण झाले आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७४ बळी गेले आहेत. यात धुळे महापालिका क्षेत्रातील १६७ व उर्वरित जिल्ह्यातील २०७ मृतांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्याही आजअखेर १३ हजार ४०३ वर पोहोचली. 

आठवडाभरापासून मृत्यू नाही 
गेल्या आठवडाभरापासून मात्र कोरोनामुळे जिल्ह्यातील मृत्यू थांबल्याचे चित्र आहे. २२ ऑक्टोबरला एक व त्यानंतर २३ ऑक्टोबरला दोन बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सात दिवसात अर्थात आज (ता.३०) अखेर कोरोनाबळींच्या संख्येत भर पडलेली नाही. त्यामुळे जिल्हावासियांसह प्रशासकीय यंत्रणेला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. 

बाधितांची संख्याही कमीच 
२३ ऑक्टोबरला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार २४६ होती. गेल्या सात दिवसात १५७ कोरोनाबाधितांची यात भर पडली. तुलनेने ही संख्याही कमी आहे. आज (ता.३०) नवीन १७ बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता १३ हजार ४०३ वर पोहोचला. शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (९२ पैकी ०२), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (०७ पैकी ०३), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (२४ पैकी ०२), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (०७ पैकी ०३), महापालिका पॉलिटेक्निक कोविड केअर सेंटर (२२ पैकी ०१), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (११७ पैकी ०२), खासगी लॅब (१४ पैकी ०४).