महापालिका, पोलिसांपुढे भाजी विक्रेते वरचढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule city hockers

महापालिका, पोलिसांपुढे भाजी विक्रेते वरचढ

धुळे : शहरातील देवपूरमधील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्‍न प्रलंबित असताना जुना मुंबई- आग्रा महामार्ग शंभरावर भाजी विक्रेते आणि टपरीधारकांनी अडवून धरला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन बेफिकीर ग्राहकांमुळे निष्पाप नागरिक, वाहनधारक वेठीस धरले जात आहेत. रोजचे असे चित्र अनेकांच्या अंगावर काटा उभे करणारे आहे. त्यातून अतिक्रमणधारक (Dhule corporation) विक्रेते महापालिका आणि वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेला (Dhule traffic police) वरचढ ठरत असल्याचे दिसते. (dhule-corporation-and-police-hockers-issue-not-solve)

देवपूरमधून जाणारा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा सरासरी ८० फुटी असलेला मुंबई- आग्रा महामार्ग अतिक्रमणधारक विक्रेत्यांमुळे सरासरी ५० ते ६० फूट वापरास उपलब्ध आहे. त्यात दुभाजकालगत उरलेली २० ते ३० फुटांची बाजू जीवघेणी ठरत आहे. संबंधित शंभरावर भाजी व विविध खाद्यपदार्थ विक्रेते पूर्वी देवपूरमधील एसएनडीटी महाविद्यालयासमोर आणि देवरे हॉस्पिटलशेजारच्या मोकळ्या पटांगणात बसत होते. तेथून त्यांना महापालिकेने हटविल्यानंतर विक्रेत्यांनी थेट हमरस्ताच अडवून धरला आहे. याच मार्गावरून रुग्णवाहिकांसह सर्व प्रकारच्या वाहनांची सतत वर्दळ असते.

वचक नसल्याने मंडई

शहरात रोजगाराचा अभाव आहे. त्यामुळे प्रामाणिकतेसह कष्टातून पोट भरणाऱ्या भाजी व इतर विक्रेत्यांविषयी कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र, त्यांना हमरस्त्यावर अतिक्रमण करण्याचा अधिकारही कुणी दिलेला नाही. मात्र, महापालिका, वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेचा अंकुश, वचक नसल्याने थेट हमरस्त्यावर मंडई स्थापन झाली आहे. त्यात बेशिस्त, आपल्यामुळे कुणाची अडचण होते किंवा नाही, कुणाचा जीव धोक्यात येऊ शकतो किंवा नाही याचे भान न राखता हमरस्त्यावरच वाहन पार्किंग करणाऱ्या नागरिकांमुळे स्थिती आणखी गंभीर होताना दिसते.

अधिकारी, नेत्यांचे दुर्लक्ष

याच मार्गावरून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आदींसह इतर अधिकारी, आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री, इतर लोकप्रतिनिधींची ये-जा असते. तरीही हमरस्त्यावरील गंभीर स्थिती खपवून घेतली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होते. या गंभीर स्थितीतून जाणारे सर्व प्रकारचे वाहनधारक, देवपूरवासीय जीव मुठीत घेऊनच हमरस्ता ओलांडतात. अतिक्रमणामुळे दुभाजकालगत उरलेल्या ४० फुटापैकी २० फुटाचा मार्ग वापरण्यास मिळतो. तोही धोकादायक स्थितीत असतो. हे लक्षात घेता कष्टकरी विक्रेत्यांचे योग्य स्थळी पुनर्वसन करावे, अशी मागणी आहे.

कोरोना प्रादुर्भावाची भीती

देवपूरमधील जुना मुंबई- आग्रा महामार्ग भाजी व इतर अतिक्रमणधारकांमुळे सायंकाळपर्यंत गजबजलेला असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती अनेक नागरिक व्यक्त करतात. त्यामुळे विक्रेत्यांना सुरक्षित व योग्यस्थळी जागा द्यावी, अशी देवपूरवासीयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuledhule police