भाजपच्या नेत्‍याला ठार मारण्याची धमकी; निनावी पत्राने धुळे मनपात खळबळ

निखील सुर्यवंशी
Thursday, 7 January 2021

वैयक्तिक धमकीचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा दुसरे निनावी पत्र मिळाले. त्यात माझ्यासह कुटुंबाला ठार मारण्याबाबत उल्लेख आहे. याव्दारे मला मानसिक त्रास दिला जात आहे.

धुळे : भाजपची प्रतिमा महापालिकेतील कामकाजाच्या माध्यमातून कशी उंचावेल, प्रशासकीय कामकाजातील गळतीला कसा लगाम घालता येईल आणि नागरिकांच्या गतीने समस्या सुटण्यासाठी यंत्रणेला जुंपण्यासाठी प्रयत्नशील स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे यांना ठार मारण्याच्या धमकीसह त्यांच्या कुटुंबाला धोका असल्याचे संकेत देणारी दोन निनावी पत्रे मिळाली आहेत. सभापतींनी स्थायी समितीच्या सभेत गुरूवारी (ता. ७) ही खळबळजनक माहिती सांगितली. 
 
तर गय करणार नाही
सभापती बैसाणे म्हणाले, की महापालिकेत प्रशासकीय यंत्रणेकडून लोकसेवकाला टार्गेट केले जाते. त्याचे मी जिवंत उदाहरण आहे. मला ठार मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र मिळाले आहे. यामागे कुणी अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्षातील जरी कुणी असला तरी त्याची गय करणार नाही. याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार देणार आहे. 

कुणाची तक्रार असेल तर समोर येण्याचे आवाहन
सभापती म्हणून कामकाज करताना जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर आहे. परंतु, मला टार्गेट केले जात आहे. पूर्वीही मला निनावी पत्र मिळाले. तै वैयक्तिक धमकीचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा दुसरे निनावी पत्र मिळाले. त्यात माझ्यासह कुटुंबाला ठार मारण्याबाबत उल्लेख आहे. याव्दारे मला मानसिक त्रास दिला जात आहे. माझ्याविषयी कुणाची तक्रार असेल तर त्याने समोर यावे. त्याचे मी स्वागत करेल, असे सभापती बैसाणे यांनी नमूद केले. सभापतींच्या स्पष्टीकरणावर नगरसचिव मनोज वाघ यांनी प्रशासनाकडून दुजाभाव होणार नाही, कायम सहकार्य राहिले आहे, असे स्पष्ट केले. नगरसेवक अमोल मासुळे यांनी सर्व सदस्य पाठीशी असल्याचे सभापती बैसाणे यांना सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation bjp leader death threats two later