
शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न कधीही कायमस्वरुपी मार्गी लागलेला नाही. समस्या वाढल्यानंतर, तक्रारी सुरु झाल्यानंतर थातुरमातुर उपाययोजना होते. त्यानंतर काही दिवसातच हा प्रश्न पुन्हा समोर येतो.
धुळे : नेहमीप्रमाणे काही दिवसांच्या खंडानंतर शहरातील कचरा संकलनासाठी फिरणाऱया घंटागाड्यांना पुन्हा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागात पाच ते आठ दिवस झाले घंटागाड्या पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा घंटागाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. काही घंटागाड्या नादुरुस्त असल्याने ही समस्या असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेला काही गाड्या भाडेतत्वावर घेण्याची वेळ आली आहे.
शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न कधीही कायमस्वरुपी मार्गी लागलेला नाही. समस्या वाढल्यानंतर, तक्रारी सुरु झाल्यानंतर थातुरमातुर उपाययोजना होते. त्यानंतर काही दिवसातच हा प्रश्न पुन्हा समोर येतो. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर या विषयाचे आता गांभीर्य उरलेले नाही. नागरिकांना मात्र पाच-पाच, आठ-आठ दिवस घरात कचरा साचल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घंटागाड्या नादुरुस्त
महापालिकेने नव्याकोऱया ७९ घंटागाड्यांची खरेदी करुन त्या ठेकेदाराला दिल्या आहेत. मात्र, यातील काही घंटागाड्या नादूरुस्त असल्याचे कारण देत प्रत्येक प्रभागातून काही घंटागाड्या कमी केल्या आहेत. याचा परिणाम म्हणुन शहरातील काही भागात घंटागाड्या पोहोचलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी त्याच-त्या भागात नियमितपणे घंटागाड्या पोहोचतात, इतर काही ठिकाणी मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांना आठ-आठ दिवसांचा साचलेला कचरा कुठे टाकावा असा प्रश्न पडतो.
भाडेतत्वावर गाड्या
ठेकेदाराकडील काही घंटागाड्या बंद असल्याने महापालिकेने भाडेतत्वावर काही गाड्या घेतल्याची माहिती मिळाली. त्यातून कचरा संकलनाचा प्रश्न निकाली काढण्याचा अधिकाऱयांचा प्रयत्न आहे. मात्र, ही समस्या वारंवार उभी राहात असल्याने प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे कर्मचारीही हैराण आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे