सफाईचा जांगडगुत्‍ता : ‘वॉटरग्रेस’कडील कामगारांचे ‘कामबंद’ तर ‘रिलाएबल’चा सुरवातीपूर्वीच नकार 

रमाकांत घोडराज
Thursday, 14 January 2021

शहरातील कचरा संकलनाच्या कामात एक ना एक अडथळा येत असल्याने शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न जटिल झाला आहे. वॉटरग्रेस प्रॉडक्टस (नाशिक) यांना दीड-दोन वर्षांपूर्वी दिलेले काम तक्रारींमुळे काढून घेण्याचा निर्णय घेतला.

धुळे : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्टसकडून काम काढून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर व महापालिका स्थायी समितीने रिलाएबल एजन्सीला काम देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही कचरा संकलनाचा गुथ्था सुटलेला नाही. आता वॉटरग्रेसकडील कामगारांनी पगार नसल्याने कामबंद केले आहे, तर रिलाएबल एजन्सीने कचरा संकलनाच्या कामालाच नकार दिला आहे. त्यामुळे गोंधळात गोंधळ, अशी स्थिती आहे. परिणामी कचरा संकलन पुन्हा ठप्प आहे. 
शहरातील कचरा संकलनाच्या कामात एक ना एक अडथळा येत असल्याने शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न जटिल झाला आहे. वॉटरग्रेस प्रॉडक्टस (नाशिक) यांना दीड-दोन वर्षांपूर्वी दिलेले काम तक्रारींमुळे काढून घेण्याचा निर्णय घेतला. ३१ डिसेंबर २०२० अखेर वॉटरग्रेसचे काम थांबविण्यात आले, अर्थात पर्यायी व्यवस्थेपर्यंत वॉटरग्रेसला काम करणे बंधनकारक होते. दरम्यानच्या काळात २०१८ मध्ये झालेल्या निविदाप्रक्रियेतील दुसऱ्या क्रमांकावरील (एल-२) रिलाएबल एजन्सीज (वसई, जि. पालघर) यांना नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून काम देण्याचे निश्‍चित केले. रिलाएबल एजन्सीनेही काही अटी-शर्तींची विनंती करून काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ७ जानेवारीला स्थायी समितीची विशेष सभा घेऊन शहरातील कचरा संकलनाचे काम रिलाएबल एजन्सीला देण्यास मंजुरी दिली. मात्र, आता रिलाएबल एजन्सीजने काम सुरू करण्यापूर्वीच या कामाला नकार दिला आहे. 

५५ लाखांचे बिल अदा 
वॉटरग्रेस प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगारांना डिसेंबर-२०२० चा पगार अद्याप झाला नसल्याने कामगारांनी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद केले आहे. बिल सादर झाल्यानंतर आवश्‍यक पूर्तता, तपासणी करून बिल अदा केले जाते. वॉटरग्रेसकडून बिल आल्यानंतर ही प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून केली जात होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजच वॉटरग्रेसचे ५४-५५ लाखांचे बिल अदा केल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आता वॉटरग्रेसकडून कामगारांना कधी पगार होतो व त्यानंतर वॉटरग्रेसकडून पुढील कामाबाबत काय भूमिका घेतली जाते त्यावरच कचरा संकलनाचे भवितव्य अवलंबून आहे. 
 
वाढीव दराची मागणी अमान्य 
कचरा संकलनाचे काम रिलाएबल एजन्सीजला देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी काम सुरू करण्यापूर्वीच रिलाएबल एजन्सीजने महापालिकेला काम करण्यास नकार दिला आहे. तसे पत्रच एजन्सीने महापालिकेला दिले आहे. काम सुरू करण्यापूर्वी एजन्सीने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाअंती काम करताना येणाऱ्या अडचणी, कामगारांची कार्यपद्धती तसेच रिलाएबलकडून पाच टक्के वाढीव दर देण्याची मागणीही स्थायी समितीने अमान्य केल्याने रिलाएबलने कामास नकार दिल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation city cleaning contract watergress and relaible not support