`सायकल डे` उपक्रमाचा फज्जा; सायकल पार्किंगची जागा रिकामीच, गाड्यांची मात्र गर्दी 

रमाकांत घोडराज
Tuesday, 5 January 2021

माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेने ‘सायकल डे‘ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सायकलचा वापर करावा असे ठरले.

धुळे : पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण निर्माण करणारी वाहने टाळून सर्वत्र सायकलीचा वापर वाढावा यासाठी महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘सायकल डे‘ (नो व्हईकल डे) उपक्रम सुरू केला आहे. पण दुसऱ्याच ‘सायकल डे‘ला या उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेने ‘सायकल डे‘ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सायकलचा वापर करावा असे ठरले. गाजावाजा करत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. मात्र, दुसऱ्याच ‘सायकल डे‘च्या उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे चित्र दिसले. महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, साहाय्यक आयुक्त विनायक कोते, नगरसचिव मनोज वाघ आदी काही बोटावर मोजण्याएवढे पदाधिकारी, अधिकारी महापालिकेत सायकलने आले. त्यांचे नगरसेवक देवेंद्र सोनार, राकेश कुलेवार यांनी स्वागत केले. 

सायकली गेल्या कुठे 
महापालिकेत वाहनधारक अधिकारी- कर्मचाऱ्यांसह नागरिकांना प्रवेश नाकारला जात होता. सायकलकर्त्याला प्रवेश होता. पार्किंगची जागा चार ते सहा सायकली वगळता रिकामी होती. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आणलेल्या सायकली कुठे गेल्या, असा प्रश्‍न उभा राहिला. दुसरीकडे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारात मोटरसायकलींची जत्रा दिसली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation cycles day not serious all staff