esakal | घरकुलात बांधले पैशांचे घर; आता होणार गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरातील एका हातमजूरी करणाऱ्या अर्जदार कुटुंबाकडून महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने पैसे उकळल्याचे प्रकरण ‘सकाळ'ने उघड केले.

घरकुलात बांधले पैशांचे घर; आता होणार गुन्हा दाखल

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासाठी अर्जदारांकडून पैसे उकळण्याचा धंदा महापालिकेच्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याने केल्याचे प्रकरण सकाळने उघड केल्यानंतर व याचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली. या प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. 

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरातील एका हातमजूरी करणाऱ्या अर्जदार कुटुंबाकडून महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने पैसे उकळल्याचे प्रकरण ‘सकाळ'ने उघड केले. हे पैसे उकळताना संबंधित कर्मचाऱ्याने केलेले उपदव्याप जनतेसमोर आणून गोरगरिबांना लुटणाऱ्यांना अद्दल घडावी यासाठी गेल्या चार दिवसांपासून पाठपुरावाही सुरू ठेवला आहे. अखेर आयुक्त शेख यांनी याची दखल घेतली. हे प्रकरण आपल्यापर्यंत आले असून आपण संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचे आयुक्त शेख यांनी सांगितले. दरम्यान, असे पैसे उकळण्याची अजुनही काही प्रकरणे समोर आली तर संबंधितांचीही गय केली जाणार नाही असेही आयुक्त शेख यांनी स्पष्ट केले. 

अनेकजणांना लुटल्याची शक्यता 
आवास योजनेच्या लाभासाठी अनेक गोरगरीब, गरजू कुटुंब महापालिकेकडे अर्ज करतात, त्यासाठी चकरा मारत असतात. याचा फायदा एका कर्मचाऱ्याने घेतला व अर्जदारांकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला. असे एक प्रकरण सकाळच्या हाती लागले. मात्र संबंधिताकडे अशा इतरही अर्जदारांची यादी असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्याकडूनही कर्मचाऱ्याने पैसे घेतले का याचा तपास आवश्यक आहे. शिवाय पैसे उकळणारा एकटाच कर्मचारी आहे की महापालिकेत याची संपूर्ण साखळी आहे. याचा शोध आवश्यक आहे. साहेबांचे रेट वाढल्याचे कारण देत संबंधित कर्मचाऱ्याने तब्बल ३० हजार रुपये हातमजूरी करणाऱ्या अर्जदाराकडून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे असे रेट वाढविणारे साहेब कोण याचाही शोध आवश्यक आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image
go to top