करवसुली विभागाची चावी हरविली...रेकॉर्ड, साहित्य सुरक्षितचे स्‍पष्‍टीकरण 

रमाकांत घोडराज
Friday, 9 October 2020

महापालिकेच्या जुन्या इमारतीत मालमत्ता करवसुली विभागाचे कार्यालय होते. सद्यःस्थितीत तेथे केवळ संगणक व सर्व्हर रूम आहे. नियमित कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीतून होते.

धुळे : महापालिकेच्या जुन्या इमारत असलेल्या मालमत्ता करवसुली विभागाची चावी गहाळ झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अखेर गुरुवारी (ता. ८) कुलूप तोडले. विभागातील सर्व रेकॉर्ड व साहित्य सुरक्षित असून, कोणतेही रेकॉर्ड अथवा इतर साहित्याची छेडछाड झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित विभागात पडून असलेले रेकॉर्डही जुने असून, त्याचे ऑडिटही झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 
महापालिकेच्या जुन्या इमारतीत मालमत्ता करवसुली विभागाचे कार्यालय होते. सद्यःस्थितीत तेथे केवळ संगणक व सर्व्हर रूम आहे. नियमित कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीतून होते. दरम्यान, जुन्या इमारतीमधील वसुली विभागाच्या दरवाजाची चावी बुधवारी (ता. ७) गहाळ झाली. शोधाशोध केल्यानंतरही ती न सापडल्याने रीतसर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला. दरम्यान, विभागाचा दरवाजा बंद असला, तरी कर भरणाचे काम सुरू होते, असे वसुली अधीक्षक बळवंत रनाळकर यांनी सांगितले. 

सर्व काही सुरक्षित 
श्री. रनाळकर, वसुली निरीक्षक मधुकर निकुंभे व कर्मचाऱ्यांनी वसुली विभागाच्या दरवाजाची दोन्ही कुलपे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तोडली. विभागातील सर्व रेकॉर्ड व साहित्याचा पंचनामा केला. सर्व रेकॉर्ड व इतर साहित्य सुरक्षित, सुस्थितीत आढळल्याचे श्री. रनाळकर यांनी स्पष्ट केले. 

विभागातील रेकॉर्ड जुने 
मालमत्ता कर विभागाचे अधिकारी, कर्मचारी नवीन प्रशासकीय इमारतीतून कामकाज करतात. जुन्या इमारतीतील कार्यालयात जुने रेकॉर्ड १९९० ते १९९५ या वर्षांचे असून, संबंधित वर्षांचे लेखापरीक्षण (ऑडिट) झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिवाय कर विभागाचे संगणकीकरण झाल्याने सर्व डाटा संगणकात फीड आहे. या ठिकाणी स्वतंत्र रूममध्ये संगणक व सर्व्हर असून, तो रूमही सुरक्षित आढळल्याचे श्री. रनाळकर म्हणाले. 
 
दोन्ही वॉचमन्सला नोटीस 
दरम्यान, चावी गहाळ प्रकरणी विभागप्रमुख रनाळकर यांनी दोन्ही शिफ्टमधील वॉचमन सुरेश चिंतामण बाविस्कर व दिलीप ताराचंद सूर्यवंशी यांच्या हलगर्जीबाबतचा अहवाल आयुक्त व आस्थापना विभागाला सादर केला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही वॉचमन्सला नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation lost the key to the tax department