धुळ्याच्या महापौरांना कोरोनाची लागण

रमाकांत घोडराज
Monday, 17 August 2020

महापालिकेची संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्यात आली. महापालिकेचे कामकाजही बंद करण्यात आले होते. उद्या (ता.१८) देखील अत्यावश्‍यक सेवा वगळता महापालिकेचे कामकाज बंद राहणार आहे.

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा घट्ट होत असतांनाच सोमवारी धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार देखील या विळख्यात सापडल्याचे समोर आले. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली असली तरी खबरदारी म्हणून उपचारासाठी ते मुंबईला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. श्री. सोनार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी महापालिकेची संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्यात आली. महापालिकेचे कामकाजही बंद करण्यात आले होते. उद्या (ता.१८) देखील अत्यावश्‍यक सेवा वगळता महापालिकेचे कामकाज बंद राहणार आहे. दरम्यान, श्री. सोनार यांचा काही दिवसांपासून अधिकाऱ्यांशी नजीकचा संपर्क न आल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महापौर दालनातील व अन्य संपर्कातील दोन-चार कर्मचारी मात्र क्वारंटाईन होतील अशी माहिती देण्यात आली. 
 
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात दररोज वाढत आहे. गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित व मृतांचा आकडाही लक्षणीयरीत्या वाढला आहे. दरम्यान, या मालिकेत सोमवारी (ता.१७) धुळ्याचे महापौर श्री. सोनार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. थोडेफार लक्षणे असल्याचे जाणवल्याने त्यांनी चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती चांगली असली तरी खबरदारी म्हणून उपचारासाठी ते मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 

मनपा सॅनिटाइज, कामकाज बंद 
श्री. सोनार यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजल्यावर महापालिकेची संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्यात आली. याशिवाय महापालिकेची जुनी इमारत, श्री. सोनार यांचे निवासस्थान आदीदेखील सॅनिटाईझ करण्यात आले. तसेच महापालिकेचे कामकाजही आज दिवसभर बंद करण्यात आले. उद्या (ता.१८) देखील महापालिकेची इमारत सॅनिटाईझ करण्यात येणार आहे, महापालिकेचे कामकाजही बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू राहतील. 

नगरसेवकालाही लागण 
शहरातील देवपूर भागातील एका नगरसेवकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित नगरसेवकाच्या कुटुंबातील काही सदस्यदेखील पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे संबंधित नगरसेवकदेखील सध्या क्वारंटाईन आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation mayor chandrakant sonar corona positive