यंत्रणांच्या मनमानीमुळे नागरिकांचे हाल; प्रश्‍न तडीस नेण्यास विरोधकही असमर्थ 

रमाकांत घोडराज
Monday, 25 January 2021

कोट्यवधी रुपयांच्या या योजनांमुळे धुळेकरांना समाधान वाटले असे चित्र पाहायला मिळाले पाहिजे होते. मात्र याउलट या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा धुळेकरांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

धुळे : शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असली तरी या कामांमध्ये सुसूत्रता नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. विशेषतः रस्त्यांच्या बाबतीत नेमके कोण चुकतय याचा थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र आहे. काही भागात रस्त्यांवर रस्ते होताहेत, तर काही भाग गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांसाठी अक्षरशः तरसतो आहे अशी स्थिती आहे. देवपूर भागात तर तुमच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना नको असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

धुळे शहरात रस्ते, गटारी, भुयारी गटारी, पाणीपुरवठा योजना अशी विविध कामे सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या योजनांमुळे धुळेकरांना समाधान वाटले असे चित्र पाहायला मिळाले पाहिजे होते. मात्र याउलट या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा धुळेकरांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

देवपूरकर त्रस्त 
शहरातील देवपूर भागात मुख्य रस्त्यांसह १५० कोटीच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. त्यापूर्वी १३६ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते, ते अधिकृतरीत्या अद्यापही संपलेले नाही. या सर्व कामांमुळे देवपूर भाग समस्यांचे माहेर बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना आपल्या घरासमोर, कॉलनी व परिसरात पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे. कुठे खड्डे, कुठे खडी, कुठे रस्ता ब्लॉक तर कुठे काम सुरू असल्याने खोळंबा अशी स्थिती आहे. 

रस्त्यांसाठी प्रतीक्षा 
ज्या भागात रस्ते होते ते कामांमुळे उखडले गेले तर दुसरीकडे अनेक भाग अद्यापही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः नवीन कॉलनी, हद्दवाढीचा भागात रस्ते, गटारी नसल्याने त्या-त्या भागातील नागरिक त्रस्त आहेत. शहरातील मुस्लिमबहुल भागाची स्थितीही अशीच मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेली आहे. या भागातील नगरसेवक आमच्या भागात रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करतात. पण, राजकीय प्रभावाअभावी त्यांच्या या मागण्या हवेतच विरून जातात. महापालिकेतही विरोधी पक्षात नगरसेवक असल्याने त्यांचे फारसे चालत नाही अशी स्थिती आहे. 

सर्वच वरचढ 
रस्ता गटाराचे काम सार्वजनिक बांधकामकडे, भुयारी गटारचे काम एमजेपीकडे, छोटी-मोठी इतर कामे महापालिकेकडे. या कामांसाठी नेमलेले ठेकेदार वेगवेगळे. ही सर्व यंत्रणा वरचढ झाल्याचे चित्र आहे. या मनमानी कारभारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सर्व गोंधळ उडाल्याची स्थिती आहे. 
 
विरोधकही असक्षम 
शहरातील या समस्यांप्रश्‍नी आवाज उठवून प्रश्‍न तडीस नेण्याइतपत विरोधकही सक्षम नसल्याने नागरिक बेवारस झाल्याचे पाहायला मिळते. अधून-मधून निवेदने दिली जातात, निदर्शने होतात, इशारे दिले जातात पण हा प्रकारही आता केवळ फोटोसेशनपुरता झाला की काय अशी शंका नागरिक घेऊ लागले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation no work in devlopment city unable to resist