
धुळे : महापालिकेची आर्थिक स्थिती यथातथा असली तरी विकासकामांना मंजुरी व कार्यादेश पाहता महापालिकेच्या माध्यमातून शहरात विकासगंगा अविरत वाहते आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटातही ‘प्रशासनाने‘ विकासाची गंगी वाहती ठेवण्याचे काम केल्याचे दिसते. उपलब्ध माहितीनुसार केवळ एका महिन्याचा लेखाजोखा पाहिला तरी महापालिकेने पावणेदोन कोटीच्या कामांचे कार्यादेश दिले. विशेष म्हणजे यातील तब्बल एक कोटीवरची कामे मनपा निधीतील आहेत. अर्थात कोणत्या कामांची किती गरज होती, कामांचा प्राधान्यक्रम लक्षात घेतला गेला का, यापेक्षा गरजेची व तातडीच्या कामे अद्यापही दुर्लक्षित राहिली का हा मात्र अभ्यासाचा विषय आहे.
कोरोनाच्या संकटाने उद्योग-धंद्यांचे आर्थिक कंबरडे मोडले एवढेच नव्हे तर केंद्र, राज्य शासनालाही आपले हात आखडते घ्यावे लागले आहेत. ही आर्थिक स्थिती सर्वत्र असली तरी धुळे महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी देण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. १० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या एका महिन्यात महापालिकेच्या बांधकाम विभागाने निर्गमित केलेल्या कामांच्या कार्यादेशाची यादी पाहिली तर या एका महिन्यात विभागाने एक कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या कामांचे कार्यादेश दिले आहेत. कामांची ही यादी स्थायी समितीपुढेही ‘अवलोकनासाठी‘ ठेवण्यात आली होती.
५ ते २५ लाखाची कामे
महापालिका आयुक्तांना ५ ते २५ लाख रुपयांच्या कामांच्या मंजुरीचे अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करून बांधकाम विभागाकडून विविध १५ विकासकामांना कार्यादेश दिले. रस्ता डांबरीकरण, रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्यांचे खड्डे बुजविणे, वॉल कंपाऊंड, मुतारी बांधणे, पाइपलाइन टाकणे, नाल्याचे बंदीस्तीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.
दहा कामे मनपा निधीतून
एकूण १५ पैकी तब्बल दहा कामे मनपा निधीतील आहेत. उर्वरित पाच कामे खासदार निधी, आमदार निधी, १४ वा वित्त आयोग, आर्थिक व दुर्बल घटक आदी विविध माध्यमातील आहेत. एकूण एक कोटी ७४ लाख २९ हजार ८८८ रुपयांच्या कामातून तब्बल एक कोटी सात लाख ३२ हजार २३२ रुपये खर्चाची कामे मनपा निधीतील आहेत. त्यामुळे विकासकामांना मनपा निधीचेही भक्कम पाठबळ असल्याचे यातून दिसते.
अशी कामे- असा खर्च
- रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण...७०,८६,५२८
- ओपनस्पेस, अमरधाम, नाल्याला संरक्षणक भिंत...३९,१७,६३०
- देवपूरमधील रस्त्यांचे खड्डे बुजविणे...२४,६२,६६९
- खेळणी, बेंचेस बसविणे...९,९६,५३०
- बंदिस्त गटार...९,९३,७६५
- नाला बंदीस्तीकरण...८,७८,१६३
- पाइपलाइन...५,९४,२५०
- मुतारी बांधणे...५,००,३५३
- आमदार निधी...२४,९४,४२० (गटार, रस्ता डांबरीकरण)
- खासदार निधी...९,९६,५३० (खेळणी, बेंचेस बसविणे)
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.