नळांना तोट्या न बसविल्यास कनेक्शन बंद; मनपाचा इशारा 

रमाकांत घोडराज
Saturday, 24 October 2020

पाण्याची होणारी नासाडी रोखण्याच्या उपाययोजनेंतर्गत नळांना तोट्या बसविण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

धुळे : महापालिकेच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेंतर्गत मालमत्ताधारकांकडील नळांना तोट्या नसतील, त्यांनी येत्या तीन दिवसांत बसवून घ्याव्यात. त्यानंतर विनातोटी नसलेली नळजोडणी महापालिकेकडून बंद करण्यात येतील व पुन्हा नळजोडणीसाठी खर्चासह दंड वसूल केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत महापालिकेने ही कारवाई करण्याचे ठरविले आहे. 
आकाश, पृथ्वी, जल, वायू, अग्नी या पंचतत्त्वांच्या संरक्षण, संवर्धनाच्या माध्यमातून भावी पिढीला चांगले व सुरक्षित वातावरण देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. अभियानांतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम होणार आहेत. या अभियानातील आवश्‍यक पाणी या तत्त्वाचेही महत्त्व नागरिकांना कळावे, यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी पाण्याची होणारी नासाडी रोखण्याच्या उपाययोजनेंतर्गत नळांना तोट्या बसविण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

तीन दिवसांत तोट्या बसवा 
नागरिकांनी आपल्याला जेवढे पाणी आवश्‍यक आहे, तेवढेच पाणी साठवून ठेवावे. बहुतेक नागरिकांकडे असलेल्या नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होते. त्यामुळे धुळे महापालिकेने शुद्ध केलेले पाणी वाया जाते. त्यामुळे ज्यांच्याकडे नळांना तोट्या नसतील, त्यांनी तीन दिवसांत त्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

त्यानंतर नळजोडणी बंद 
तीन दिवसांनंतर महापालिकेचे ओव्हरसियर, सुपरवायझर, व्हॉल्व्हमन यांना विनातोटीचा नळ आढळल्यास संबंधितांना कोणतीही नोटीस न देता नळजोडणी बंद करण्यात येईल. बंद केलेली नळजोडणी पुन्हा सुरू करण्यासाठी नळजोडणी बंद करण्यासाठी महापालिकेने केलेला खर्च दंडासहित वसूल केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation the pipes are not fitted connection will be closed