esakal | तुमच्या ‘नाकर्तेपणा’मुळे आम्ही ‘बदनाम’; लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर ठपका 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

पाणीपुरवठ्यासह विविध विषयांवर अधिकाऱ्यांकडून तीच ती व थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याचे पाहून खासदार डॉ. भामरे यांनी संताप व्यक्त करत महापालिकेचे प्रशासन ढिम्म झाले आहे.

तुमच्या ‘नाकर्तेपणा’मुळे आम्ही ‘बदनाम’; लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर ठपका 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील कचरा संकलन, विस्कळित पाणीपुरवठा, भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आदी विविध मुद्यांवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सोमवरी (ता. १९) महापालिका प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सत्ताधारी या नात्याने आम्ही बदनाम होतोय, नगरसेवकांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावं, अशी उद्विग्नता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 
शहरात सुरू असलेल्या योजनांचा आढावा तसेच समस्यांबाबत चर्चेसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सोमवारी महापालिकेत बैठक घेतली. महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, आयुक्त अजीज शेख, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक, एमजेपीचे अधीक्षक अभियंता एस. सी. निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह, महावितरणचे अधिकारी, योजनांच्या ठेकेदाराचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

प्रशासन ढिम्म, रोष आमच्यावर 
पाणीपुरवठ्यासह विविध विषयांवर अधिकाऱ्यांकडून तीच ती व थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याचे पाहून खासदार डॉ. भामरे यांनी संताप व्यक्त करत महापालिकेचे प्रशासन ढिम्म झाले आहे. प्रशासनावर आपली पकड नाही, असे थेट आयुक्त शेख यांना उद्देशून सुनावले. अक्कलपाडा पाणीयोजना धुळे शहरासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून धुळेकरांना रोज पाणीपुरवठ्याचा शब्द आम्ही जनतेला दिला आहे. योजना पूर्णत्वास येईपर्यंत महापालिकेने पाणीपुरवठ्याचे काय नियोजन केले आहे, असा प्रश्न डॉ. भामरे यांनी विचारला. महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे यांनी याबाबत उत्तर दिले खरे, पण झोनिंगच्या निविदेवर श्री. अग्रवाल यांनी आक्षेप घेत अनुप निविदेतील अटी-शर्तींमुळे ही निविदाच फेल जाईल, असे सांगितले. त्यावर डॉ. भामरे यांनी अभ्यासू व्यक्तीच्या माध्यमातून निविदा का बनविली नाही. तुमच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचा रोष आमच्यावर येतो, असे सुनावले. पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने वीज कंपनीनेही मनपातील सत्ताधाऱ्यांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा आरोपही श्री. अग्रवाल यांनी केला. 

स्वच्छतेत नंबर कसा आला? 
कचरा संकलन, अस्वच्छतेच्या तक्रारी कायम आहेत. मग स्वच्छतेत धुळ्याने नंबर कसा मिळवला, असा थेट सवालच डॉ. भामरे यांनी अधिकाऱ्यांना केला. अधिकाऱ्यांच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने डॉ. भामरे संतप्त झाले. प्रशासनाच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्ष, नेतृत्व, नगरसेवक बदनाम होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. ठेकेदार जुमानत नाही, ही बाब योग्य नसल्याचेही ते म्हणाले. नगरसेवक शीतल नवले यांनी शौचालयांचा प्रश्‍न मांडला. 

अग्रवाल यांची उद्विग्नता 
विविध समस्या, प्रश्‍नांवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रशासनाने आमची इतकी बदनामी केली की, आता असं वाटतं सर्व नगरसेवकांनी राजीनामा द्यावा आणि अशी घरी बसावं, अशी परिस्थिती निर्माण केल्याची उद्विग्नता श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केली.