
मार्चमध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना संकट निवारण्याच्या कामात गुंतली. शिवाय सुरुवातीच्या काळात खासगी दवाखानेही बंद होते. अगदी आजघडीला देखील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या तुरळक दिसून येते.
धुळे : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे सुरुवातीच्या काळात इतर विविध आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी मोठी कसरत करावी लागली. या संकटाने क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहिमेलाही मोठा फटका बसला आहे. कोरोना संकटाच्या या आठ महिन्यात शहरात साधारण ५० टक्के रुग्ण (विशेषतः क्षयरुग्ण) समोर येऊ शकले नाहीत असा डॉक्टरांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर १ ते ३१ डिसेंबरदरम्यान सुरू होणारी क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
मार्चमध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना संकट निवारण्याच्या कामात गुंतली. शिवाय सुरुवातीच्या काळात खासगी दवाखानेही बंद होते. अगदी आजघडीला देखील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या तुरळक दिसून येते. कोरोनाच्या भीतीने खोकल्यासह इतर लक्षणे असताना अनेक रुग्णांनी दवाखान्यात जाणे टाळले. डॉक्टरदेखील हात लावत नव्हते अशी स्थिती होती. ही सर्व स्थिती लक्षात घेता गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत क्षय व कुष्ठरुग्णांचा शोध व उपचाराची परवड झाली असाच निष्कर्ष निघतो.
५० टक्के परिणाम
कोविड -१९ च्या आपात्कालिनी परिस्थितीमुळे क्षय व कुष्ठरुग्णांचे निदान व त्यांना औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षाच्या तुलनेत यावर्षी (२०२० मध्ये) अत्यंत कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात असल्याचे महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागाने म्हटले आहे. कोरोनाच्या काळातील गेल्या आठ महिन्यात साधारण ५० टक्के रुग्ण समोर येऊ शकलेले नाहीत, त्यांच्यावर उपचार झाला नसल्याचे डॉक्टर म्हणतात.
रुग्णशोध मोहीम महत्त्वाची
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता १ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणारी क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील जोखमीच्या भागांमध्ये (झोपडपट्टी, बांधकाम ठिकाणे, मजूर वस्ती, स्थलांतरित लोकसंख्या आदी) रुग्णांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तातडीने उपचाराखाली आणले जाईल. महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, साहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाट, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, कुष्ठरोग विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. रमाकांत पाटील, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मेहिम राबविण्यात येणार आहे.
मोहिम अशी
- १ ते ३१ डिसेंबरदरम्यान मोहीम
- साधारण ४२ हजार घरांना भेटी
- १२० टिम
- एका टिममध्ये दोन सदस्य
- ३० पर्यवेक्षक
संपादन ः राजेश सोनवणे